फोटो सौजन्य - Social Media
प्रवीण शिंदे, सांगली : भारतीय संगीतविश्वातील अजरामर गायिका आशा भोसले यांचे नाव घेताच त्यांच्या सुरेल, बहुरंगी आणि भावस्पर्शी गायकीची आठवण येते. मात्र त्यांच्या या अफाट यशामागे सांगलीशी असलेले घट्ट नातेही तितकेच महत्त्वाचे आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीतील गोंधळी गल्ली येथे त्यांचा जन्म झाला आणि याच भूमीतून त्यांच्या सुरांच्या प्रवासाची सुरुवात झाली. लहान वयातच संगीताची गोडी लागलेल्या आशाताईंनी वयाच्या नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरातूनच संगीताचे संस्कार मिळाले. पुढे कुटुंब पुणे आणि मुंबईत स्थायिक झाले, तरी त्यांच्या कलेची पाळेमुळे सांगलीतच रोवली गेली.
सांगलीनेही आपल्या या लाडक्या कन्येचा कायम अभिमान बाळगला. “सांगली भूषण” पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, तर मंगेशकर कुटुंबाच्या सन्मान सोहळ्याने शहराच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान मिळवले. तरुण भारत क्रीडांगणावर झालेल्या या भव्य कार्यक्रमात लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा सन्मान करण्यात आला होता.
आशाताईंच्या गायकीने मराठी भावगीत, भक्तिगीत आणि लावणीसारख्या विविध संगीतप्रकारांना नवे आयाम दिले. सांगलीतील संगीत मैफिली आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना वेगळीच उंची मिळाली आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली.
आजही सांगलीतील रसिक त्यांच्या मैफिलींच्या आठवणी जपून आहेत. सुरांनी भारलेले वातावरण आणि आशाताईंच्या आवाजाची जादू अजूनही ताजी आहे. आशा भोसले आणि सांगली यांचे नाते केवळ जन्मापुरते मर्यादित नसून, भावनिक आणि सांस्कृतिक स्तरावर घट्ट विणलेले आहे. त्यांच्या सुरांनी सांगलीच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले, तर सांगलीनेही आपल्या ‘आशा’ला मनापासून जपले, हेच या नात्याचे खरे वैशिष्ट्य आहे.






