( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सनई चौघडे’ सध्या कथानकातील रोमँटिक आणि थरारक वळणामुळे चर्चेत आहे. मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात हळूहळू जवळीक वाढताना दिसत असून, आगामी भागांमध्ये दोघांच्या नात्याला नवे वळण मिळणार आहे. याचदरम्यान जय शरूचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसणार आहे.
ऑफिसमधील एका पार्टीदरम्यान जय आणि शरू यांना चुकून जोडपे समजले जाते. त्यानंतर घरी परतताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. या प्रसंगात जय शरूचे प्राण वाचवण्यासाठी धाडसी लढा देतो. या अॅक्शन आणि भावनिक प्रसंगांचे चित्रीकरण कलाकारांसह संपूर्ण टीमसाठी मोठे आव्हान ठरले.
मालिकेत जयची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळेने या शूटिंगचा अनुभव सांगताना म्हटले, “हा अनुभव खूपच भन्नाट आणि समाधान देणारा होता. पहिल्यांदाच मी रात्रभर पावसात अॅक्शन सीन शूट केला. अशा प्रकारचे सीन करण्याची माझी नेहमीपासून इच्छा होती. शूटिंगच्या १० ते १५ दिवस आधीपासून मी नियमित वर्कआउट, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आणि हाय-प्रोटीन डाएट सुरू केले होते.”
तो पुढे म्हणाला, “शूटिंगच्या दिवशी तब्बल सहा तास पावसात भिजत फाईट सीन केला. प्रत्येक शॉटपूर्वी शरीराचा पंप कायम ठेवण्यासाठी पुन्हा वर्कआउट करावं लागत होतं. त्यामुळे रात्रभर शूटिंग आणि वर्कआउट दोन्ही सुरू होतं.”
राज याने सांगितले की, संपूर्ण टीमने त्याला मोठी साथ दिली. दिग्दर्शक, फाईट मास्टर्स आणि सहकलाकारांच्या मदतीमुळे अवघड अॅक्शन सीन सहज पूर्ण झाला. मात्र, शूटिंगनंतर त्यांच्या शरीरावर ओरखडे आणि रॅशेस दिसून आले. याबाबत ते म्हणाले, “या सीनमध्ये मला शरवरीला उचलून अॅक्शन करायची होती. तिच्या ड्रेसच्या डिझाइनमुळे माझ्या शर्टलेस शरीरावर ओरखडे पडले. त्या वेळी ते जाणवलं नाही, पण नंतर त्याच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या.”
या अॅक्शन सीन्समुळे जय आणि शरू यांच्या नात्यातील एक महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेम, भावना आणि थरार यांचा संगम असलेले हे आगामी भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार असल्याचा विश्वास राज हंचनाळे यांनी व्यक्त केला आहे.
Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप






