Chandrapur News: जानाळा-पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामावर काँग्रेस आक्रमक; 10 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा बेमुदत उपोषण
जानाळा-पोंभूर्णा मार्गावरील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामादरम्यान अनेक गावातील पाणीपुरवठ्याच्या भूमिगत पाइपलाइन फुटल्याने काही ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता वंजारी यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यावेळी काम नियमांनुसार केले जाईल आणि नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. यापूर्वी रस्तारोको आंदोलन करूनही प्रशासन आणि कंत्राटदाराने दखल घेतली नसल्याने आता काँग्रेसने दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत कामाचा दर्जा सुधारला नाही, तर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दरम्यान, जानाळा-पोंभुर्णा मार्गासोबतच मूल-चामोर्शी मार्गावरील कामाबाबतही निकृष्ट दर्जाच्या तक्रारी समोर येत असून, दोन्ही कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जानाळा-पौभूर्णा मार्गावरील कामाबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला होता, त्यानंतर काम नियमांनुसार होईल, नागरिकांना त्रास होणार नाही आणि गुणवत्तेची तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, निकृष्ट कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
आनाळा-पोभूर्णा मार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम तातडीने सुधारावे, कंत्राटदारावर कारवाई करून गुणवत्तेनुसार काम पूर्ण करावे, अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे. प्रशासनाने पुढील दहा दिवसात ठोस कार्यवाही केली नाही, तर काँग्रेसच्यावतीने बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालू नये, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला.






