संग्रहित फोटो
वरोरा : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात किरकोळ वादातून चुलत काकाने पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
प्रभू नागेश चिंतलवार (वय २८, रा. यात्रा वॉर्ड, वरोरा) हे भंगार गोळा करण्याचे काम करतात. गुरुवारी रात्री घराबाहेर मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्यांचे चुलते पोचमल्लू मधुकर दांडेकर तेथे आले. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने स्वतःला ‘वडार मोहल्ल्याचा डॉन’ म्हणत पँटच्या खिशातून लोखंडी चाकू काढला. यानंतर आरोपीने ‘आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून स्मशानात टाकतो,’ अशी धमकी देत प्रभू चिंतलवार यांच्या पोटावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी ते पळू लागले असता आरोपीने पाठलाग करून त्यांच्या पाठीवरही चाकूने वार केला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाडस करून आरोपीला पकडले. गंभीर जखमी झालेल्या प्रभू चिंतलवार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या तक्रारीवरून आरोपी पोचमल्लू याच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला व खुनाच्या प्रयत्नासंदर्भातील १०९ (१) ३५१(२) बीएनएस कलमांनुसार शनिवारी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अजिंक्य पवार करीत आहेत.
मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेत जमिनीच्या रस्त्याच्या वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्या खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. गणेश रामभाऊ मरगळे (वय २३), सुनील रामभाऊ मरगळे (वय २०), विजय बाबूराव मरगळे, राजू ज्ञानेश्वर मरगळे (वय १९), राजू रामभाऊ मरगळे (वय २०, सर्व रा.करंजावणे वस्ती, किरकटवाडी, ता. मुळशी, जि. पुणे ) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.






