फोटो सौजन्य - Social Media
चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे भागुबाई ही व्यक्तिरेखा. मनमिळाऊ, मदतीसाठी नेहमी तत्पर आणि गावातील प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवणारी अशी तिची ओळख आहे. गावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची तिला खबर असते आणि नकळत ती त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवत राहते. तिच्या या सवयीमुळे अनेकदा मजेशीर प्रसंग निर्माण होतात, तर कधी गैरसमज आणि वादालाही तोंड फुटते. मात्र, भागुबाईच्या बोलण्यामागे कोणाचेही नुकसान करण्याचा हेतू नसतो. उलट तिच्या मनात गावातील लोकांविषयी आपुलकी आणि त्यांचे भले व्हावे अशीच भावना असते. पण तिच्या या स्वभावामुळे एका टप्प्यावर गावात मोठा गोंधळ निर्माण होतो आणि घटनांच्या ओघात तिचा आवाजही जातो. त्यामुळे काही काळ ती बोलू शकत नाही.
याच काळात गावकऱ्यांना भागुबाईचे खरे महत्त्व समजू लागते. तिच्या गप्पा थांबल्यानंतर गावात एक वेगळीच शांतता निर्माण होते. मात्र, जेव्हा ती पुन्हा बोलू लागते, तेव्हा अनेक नात्यांमधील दडलेली सत्ये समोर येतात. तिच्या वागण्यामागचा खरा उद्देशही उलगडतो. त्यानंतर गावकऱ्यांना जाणवते की, तिच्या बोलण्यात जरी कधी टोचणी असली तरी त्यामागे लोकांचे भले करण्याचीच भावना दडलेली होती. चित्रपटातील भागुबाई ही भूमिका अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी साकारली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा अधिक जिवंत झाली आहे. त्यांच्या सोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर आणि भार्गवी चिरमुले यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत कथेला अधिक रंगत आणली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून श्रद्धा पटेल यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ग्रामीण जीवनातील नातेसंबंध, मानवी स्वभाव आणि समाजातील संवादाचे महत्त्व यांचा वेध घेणारे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि कौटुंबिक मनोरंजन देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. ‘भागुबाई’ हा चित्रपट विनोद, भावना आणि सकारात्मक सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ आहे. भागुबाईचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आणि तिची कथा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला स्पर्श करेल, असा आम्हाला विश्वास आहे. हास्य, भावनिक क्षण, कौटुंबिक नाती आणि विचार करायला लावणारा संदेश यांचा सुरेख संगम असलेला ‘भागुबाई’ हा चित्रपट आता संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर अवघ्या 19 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच हृदयाला स्पर्श करणारी कथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.






