( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bhootam Bhayam Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री छाया कदम पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्या आगामी प्रकल्पातील ‘जठाई’ या रहस्यमय व्यक्तिरेखेचा लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पोस्टरमधील भयावह चेहरा, भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व पाहून अनेकांना पहिल्या नजरेत छाया कदम यांना ओळखणंही कठीण झालं. हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी राखी सावंत हिचे नाव घेतले होते. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्या अशा पूर्णपणे वेगळ्या आणि धक्कादायक भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
टीझरनंतर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दल निर्माण झालेली उत्सुकता या नव्या पोस्टरमुळे आणखी वाढली आहे. सोशल मीडियावरही जठाईच्या लूकची चर्चा रंगू लागली असून, या पात्रामागचं रहस्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या, “या भूमिकेसाठी दररोज सुमारे साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा आणि तो काढायलाही जवळपास तितकाच वेळ जायचा. इतका जड मेकअप आणि वेशभूषा परिधान करून काम करणं शारीरिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक होतं. माझ्या प्रत्येक हालचालींवर मर्यादा यायच्या. मात्र ‘जठाई’चं व्यक्तिमत्त्व पडद्यावर प्रभावी दिसावं यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली.”
View this post on Instagram
त्या पुढे म्हणाल्या, “अशा वेगळ्या भूमिका साकारताना कलाकार म्हणून वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो. प्रेक्षकांना ‘जठाई’चा लूक आणि तिचं रहस्यमय व्यक्तिमत्त्व नक्कीच लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.”
‘जठाई’ या व्यक्तिरेखेसाठी वापरण्यात आलेला प्रोस्थेटिक मेकअप, खास वेशभूषा आणि बारकाईने तयार करण्यात आलेला लूक यामुळे ही भूमिका अधिक प्रभावी बनली आहे. पोस्टर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी छाया कदम यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशनचंही कौतुक केलं आहे.
आता ‘जठाई’ ही रहस्यमय व्यक्तिरेखा पडद्यावर कोणती नवी कथा घेऊन येणार आणि छाया कदम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना किती प्रभावित करणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.






