( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dhanashri Kadgaonkar stuck on Mumbai Pune Expressway: राज्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असून काही ठिकाणी नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय( 6 जुलै) पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती. मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक २ च्या प्रवेशद्वावर सोमवारी पहाटे दरड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक बंद होतीय आज काल तब्बल साडेअठरा तासांनंतर पुणे – मुंबई मिसिंग लिंक सुरळीत झाला आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे अनेक प्रवाशांचा तासन् तास खोळंबा झाला होता. वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीचा प्रवाशांसह एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीलाही बसला. अभिनेत्री धनश्री काडगांवर सुद्धा या वाहतूक कोंडीत जवळपास ९ तास अडकली होती. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मुसळधार पाऊस, अपघात किंवा दरड कोसळल्यामुळे एक्स्प्रेसवेवर झालेली वाहतूक कोंडी यांसारख्या घटना मी यापूर्वी फक्त बातम्यांमध्ये पाहिल्या होत्या. पण, काल (६ जुलै २०२६) मला स्वतःलाच या परिस्थितीचा सामना करावा लागला. अशाप्रकारे सलग नऊ तास वाहतूक कोंडीत अडकून राहणं हे प्रचंड थकवणारं आणि वैताग आणणारं होतं.”
तिने पुढे महिलांना अशा परिस्थितीत येणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला. “यादरम्यान मला मासिक पाळी सुद्धा आली होती. पण, वॉशरूमलाही जाता आलं नाही. फूड कोर्टवर काहीतरी खाऊया म्हटलं, तर तेही शक्य नव्हतं. गुडघाभर पाणी साचलं होतं. कुठे ओलं व्हायचं? आजारपण आता परवडणारं नाहीये, कारण सलग शूटिंग सुरू आहे,” असं धनश्रीने म्हटलं.
ती म्हणाली, “माझा ड्रायव्हर मला बोलत होता, ‘मॅडम, आपण परत पुण्याला जाऊयात.’ पण, आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो. टेलिकास्ट अडकला होता म्हणून शेवटी मी हळूहळू का होईना, पण सेटवर पोहोचले.”
तिने पुढे निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो, याची जाणीव करून देत भावनिक शब्दांत प्रार्थना व्यक्त केली. “निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही. पण देवापुढे इतकीच प्रार्थना की, कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस,” असं धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






