(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Swarada Thigale: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘माझे मन तुझे झाले’ आणि ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्वरदा लवकरच आई होणार आहे. नुकतच स्वरदाचे डोहाळेजेवण मोठ्या थाटात पार पडले. तिने सोशल मीडियावर तिच्या डोहाळेजेवणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काहीदिवसांपूर्वी तिच्या चोर ओटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. स्वरदाने अलिकडेच नवऱ्यासोबत खास फोटोशूट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. लवकरच अभिनेत्रीच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
स्वरदा ठिगळेने 2024 मध्ये सिद्धार्थ राऊतशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 2 वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार आहे. नुकताच अभिनेत्रीच्या घरी मराठमोळ्या पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. हा व्हिडिओ पोस्ट करताना स्वरदाने लिहिले, एक वर्षापूर्वी मी कधीच कल्पना केली नव्हती की, माझ्या पोटात वाढणाऱ्या या छोट्याशा जीवासाठी मी इतक्या प्रेमाने ‘डोहाळ जेवण’ सोहळ्याची तयारी करत असेन. आज आरशात मला फक्त माझा बेबी बंप दिसत नाही… दिसतंय ते आई होण्याचं सुंदर स्वप्न, कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद, छोट्याशा हातांची ऊब, असंख्य जागरणं, निरागस हास्य आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या अनमोल आठवणी.”
यानंतर अभिनेत्रीने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “माझं मन आनंदाने भरून आलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि माझ्या बाळा… आम्ही तुला भेटण्याचे दिवस मोजत आहोत. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आशीर्वादाचा छोटासा उत्सव आहे.”
या भावनिक पोस्टसोबत अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचा एक खास व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही ‘डोहाळ जेवण’ सोहळ्यातील आनंदाचे क्षण साजरे करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, लवकरच आई-बाबा होणाऱ्या या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच अभिनेत्रीच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून, प्रत्येकजण या खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.
डोहाळे जेवणाच्या सोहळ्यासाठी स्वरदा ठिगळे हिने पारंपरिक हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती, तर तिच्या पतीने कुर्ता-पायजमा असा साधा आणि आकर्षक लूक केला होता. दोघांचा हा व्हिडिओ अतिशय गोड आणि भावनिक असून, ते प्रेमाने स्वरदाच्या बेबी बंपकडे पाहताना आणि आपल्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
View this post on Instagram
स्वरदाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “खूप सुंदर”, “देव आशीर्वाद देवो”, “लवकरच गोंडस बाळाचं स्वागत होवो” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.






