(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ‘जिगिशा’ ही नवी आणि बहुरंगी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आधुनिक विचारसरणी, महत्त्वाकांक्षा आणि अनेक भावनिक छटांनी सजलेली जिगिशा ही Gen Z पिढीचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा असल्याचं अनुष्काने सांगितलं आहे. या भूमिकेमुळे प्रेक्षकांना तिच्या खऱ्या स्वभावाचीही झलक पाहायला मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.
अनुष्का म्हणाली, “जिगिशा ही पूर्णपणे Gen Z मुलगी आहे. तिची आई आणि मातोश्री या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे जिगिशाचं लग्न मातोश्रींचा मुलगा शंकरसोबत व्हावं, अशी तिच्या आईची इच्छा आहे. मात्र जिगिशाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा आहेत. मातोश्रींसमोर ती वेगळी असते, शंकरसोबत वेगळी आणि आईसमोर तिचं खरं रूप दिसतं. या तिन्ही छटा साकारताना मला खूप आनंद मिळतो.”
या भूमिकेसाठी झालेल्या निवडीमागील किस्साही तिने सांगितला. त्यावेळी ती आधीच एका चित्रपटासाठी करारबद्ध झाली होती आणि त्याच काळात मालिकेचं शूटिंग सुरू होणार होतं. सुरुवातीला तारखांच्या अडचणीमुळे मालिका करता येणार नाही, असं तिला वाटलं होतं. मात्र, चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसने शूटिंगचं नियोजन इतकं सुरेख केलं की तिला चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
अनुष्काने सांगितलं की, दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीमने तिला जिगिशासाठी फक्त एकच सूचना दिली होती – “तू जशी आहेस, तशीच ही भूमिका साकार.” त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना तिला स्वतःचाच एक भाग पडद्यावर साकारत असल्याची भावना येते.
शूटिंगच्या पहिल्या दिवसाचाही अनुभव तिने शेअर केला. त्या दिवशी ती साताऱ्यात एका चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि योगायोगाने मालिकेचं पहिलं शूटिंगही साताऱ्यातील मंदिरातच होतं. “The stars are aligned!” असंच त्या वेळी वाटल्याचं ती म्हणाली. पहिल्याच दिवशी मोठी गर्दी, आउटडोअर शूटिंग आणि पावसामुळे अनेक अडचणी आल्या. मात्र, पाऊस सुरू झाला की सेटवर चहा आणि कांदा भजींसोबत छोटेखानी पावसाळी पिकनिक रंगायची, अशी मजेशीर आठवणही तिने सांगितली.
सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना अनुष्काने ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि नंदिनी ताई यांचं विशेष कौतुक केलं. त्या दोघीही सेटवर आईप्रमाणे काळजी घेतात, रोज काही ना काही खायला आणतात आणि प्रेमाने वागवतात, असं ती म्हणाली. माझी आणि नंदिनी ताईंची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी छान जुळली आहे की, सेटवर अनेक जण आम्हाला खऱ्या आयुष्यातील आई-मुलगी समजतात, असंही तिने सांगितलं.
झी मराठीवर काम करण्याचं स्वप्न लहानपणापासूनच होतं, असं सांगताना अनुष्का म्हणाली की, “मी लहानपणापासून आई आणि आजीसोबत झी मराठीच्या मालिका पाहत मोठी झाले. त्यामुळे या वाहिनीचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे.”
याशिवाय तिने तिचा पती आणि अभिनेता मेघन याचाही उल्लेख केला. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘कृष्णाईच्या लेकी’ या दोन्ही मालिकांचं शूटिंग एकमेकांच्या शेजारी होत असल्याने आता दोघांनाही एकत्र अधिक वेळ घालवता येतो. सकाळी शूटिंगला सोडणं आणि संध्याकाळी घरी घेऊन जाणं, हा आता त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला असल्याचं ती हसत म्हणाली.
शेवटी प्रेक्षकांना आवाहन करत अनुष्का म्हणाली, “‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेला आणि माझ्या जिगिशा या व्यक्तिरेखेलाही भरभरून प्रेम द्या. पुढील भागांमध्ये अनेक नाट्यमय वळणं आणि रंजक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.”






