(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Netflix controversy: हॉलिवूडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून, आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरोधात तब्बल १०५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १००१.९७ कोटी) नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. निर्माता सायमन अफ्राम यांनी अभिनेता निकोलस केज अभिनीत त्यांच्या अप्रदर्शित ‘Fortitude’ चित्रपटाची मास्टर कॉपी नेटफ्लिक्सच्या स्टुडिओमधून चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.
कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, जून महिन्यात नेटफ्लिक्सच्या विनंतीवरून निर्मात्यांनी दुसऱ्या महायुद्धावर आधारित ‘Fortitude’ या चित्रपटाची एनक्रिप्ट न केलेली मास्टर कॉपी कंपनीकडे सुपूर्द केली होती. मात्र, नऊ दिवसांनी नेटफ्लिक्सने ईमेलद्वारे कळवलं की, त्यांच्या कार्यालयातील डेस्कवरून अनेक हार्ड ड्राइव्ह चोरीला गेल्या असून त्यामध्ये ‘Fortitude’ची ड्राइव्हही होती.
निर्मात्यांच्या वकिलांनी दावा केला आहे की, हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी सात वर्षे लागली आणि त्यासाठी ४५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹४२९.४१ कोटी) खर्च करण्यात आला. हा चित्रपट नेटफ्लिक्स किंवा इतर वितरकांना विकण्याची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचिकेत पुढे म्हटलं आहे की, चित्रपटाची मास्टर कॉपी चोरीला गेल्यानंतर पायरसीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पायरसी साइट्सवर चित्रपट उपलब्ध झाल्यास वितरक त्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करणार नाहीत, त्यामुळे चित्रपटाचं व्यावसायिक मूल्य घटल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. नेटफ्लिक्सने हार्ड ड्राइव्हच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घ्यायला हवी होती, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, नेटफ्लिक्सने या आरोपांना फेटाळून लावत अधिकृत निवेदन जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, उद्योगमान्य सुरक्षा उपायांशिवाय सादर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या नुकसानीची जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. तसेच, चित्रपटाचे हक्क आमच्याकडे नसले तरी निर्माते आणि त्यांच्या टीमला सहकार्य करण्यासाठी पायरसी तपास आणि अनधिकृत वितरणावर लक्ष ठेवण्यासारख्या अतिरिक्त उपाययोजना केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नेटफ्लिक्सने आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं की, सायमन अफ्राम यांचे वकील या परिस्थितीचा गैरफायदा घेत कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात रंगणार असून, हॉलिवूडमध्ये याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.






