(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गायक Abhijeet Sawant गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये अनेक तर्क-वितर्क रंगले होते. हा नवा लूक आगामी गाण्यासाठी आहे का? एखादा चित्रपट येतोय का? अशा प्रश्नांची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता या चर्चांवर पडदा पडला असून अभिजीतच्या दोन नव्या प्रोजेक्ट्सची माहिती समोर आली आहे.
Abhijeet Sawant हा मराठी आणि हिंदी संगीतविश्वातील एक लोकप्रिय आवाज म्हणून ओळखला जातो. ‘Indian Idol’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर त्याने आपल्या गायकीच्या जोरावर देश-विदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. काळानुसार संगीताची शैली बदलत गेली, तरी अभिजीतने आपल्या सुमधुर आवाजाने आणि वेगवेगळ्या प्रयोगशील प्रोजेक्ट्समुळे तरुणाईतही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तो लवकरच दोन नव्या प्रोजेक्ट्समधून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
यापैकी एका प्रोजेक्टसाठी अभिजीतने नुकतेच कोकणात चित्रीकरण केले आहे. कोकणच्या निसर्गरम्य आणि समृद्ध वातावरणात चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. समुद्रकिनारे, हिरवाई आणि कोकणच्या सौंदर्याने नटलेला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे, आगामी स्वप्नसुंदरी या चित्रपटातही अभिजीतचा आवाज ऐकायला मिळणार आहे. Bhushan Pradhan आणि Sayali Patil यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी तो एक खास गाणे सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. २४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिजीतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, या दोन प्रोजेक्ट्सपुरतेच नव्हे तर आगामी काळातही अभिजीत सावंत अनेक वेगळ्या आणि उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्समधून रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी येणारे दिवस संगीतमय मेजवानी घेऊन येणार, यात शंका नाही.






