( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ashadhi Wari Special: झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांना या वर्षी आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’ या मालिकांमध्ये आषाढी वारी विशेष भाग सादर करण्यात येणार असून, भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम या भागांत पाहायला मिळणार आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेत परब कुटुंब डबेवाल्यांना घरी भोजनासाठी निमंत्रित करत आषाढी वारीचा सोहळा साजरा करणार आहे. पमा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून डबेवाल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. भजन-कीर्तनाच्या गजरात संपूर्ण घर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेलं दिसणार आहे.
पमाची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी यांनी सांगितले की, त्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव नसला तरी या भागाच्या चित्रीकरणादरम्यान पांडुरंगाची सेवा केल्याचा भास झाला. सेटवर वारकरी वेशातील एका लहान मुलाची सेवा करताना मनाला मिळालेलं समाधान त्यांनी शब्दांत व्यक्त केलं.
याच भागात जयची भूमिकाही महत्त्वाचं वळण घेणार आहे. पहिल्यांदाच जय शेकडो वारकऱ्यांसाठी मोठ्या भांड्यात खिचडी बनवताना दिसणार आहे. याबाबत अभिनेता राज हंचनाळे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणं किती जबाबदारीचं आणि कष्टाचं काम असतं, याची जाणीव या प्रसंगामुळे झाली.
दुसरीकडे ‘कमळी’ मालिकेतही आषाढी विशेष भागातून कथानकाला नवं वळण मिळणार आहे. सरोजच्या आगमनामुळे महाजन कुटुंबातील अनेक प्रश्न निर्माण होणार असून, कमळीच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा धागाही तिच्या हाती लागणार आहे.
कमळीची भूमिका साकारणाऱ्या विजया बाबर यांनी सांगितले की, आरती, अभंग आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे संपूर्ण सेट भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता. चित्रीकरणादरम्यान कलाकार आणि तांत्रिक टीमनेही अभंग गात आषाढीचा आनंद साजरा केला.
भक्ती, अन्नसेवा, संस्कृती आणि कथानकातील नवे ट्विस्ट यांचा सुंदर मिलाफ असलेले ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’चे आषाढी विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहेत.






