(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Akshay Kelkar on NEET Paper Leak: नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या महिन्याभरापासून सुरूच आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून 20 जुलैला या आंदोलनला हिंसक वळण लागलं. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज करण्यात आला तसेत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या, लाठीचार्जदरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले आहे.
या विद्यार्थी आंदोलनाला आता मराठीसह अनेक कलाकार मंडळींनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान अभिनेता अक्षय केळकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी केली आहे. यासोबतच त्याने शिक्षण व्यवस्था, आरक्षण आणि गुणवत्तेच्या आधारे संधी देण्याबाबतही भाष्य केले आहे.
अक्षय केळकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “सरकारने विद्यार्थी मोर्चा, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या सर्व गंभीर विषयांकडे तातडीने लक्ष द्यावे. जिथे आमदार फुटू नयेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, तिथे पेपर फुटू नयेत यासाठीही नक्कीच सुरक्षित व्यवस्था उभी करता येऊ शकते.”
पुढे शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत मत व्यक्त करत अक्षय केळकर म्हणाला, “शिक्षणातील जातीवाद आणि धर्मवाद समूळ संपायला हवा. जात-धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी.”
View this post on Instagram
यानंतर नोकरीच्या संधींबाबतही त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. “शिक्षणाचा समान हक्क प्रत्येकाला मिळत असल्यामुळे नोकऱ्यांमध्येही गुणवत्तेलाच प्राधान्य दिले जावे,” असे त्याने म्हटले.
पोस्टच्या शेवटी अक्षय केळकरने “मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू… सारे भारतीय माझे बांधव आहेत! जय हिंद!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
नीट पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) जवळपास महिनाभर आंदोलन करत आहे. या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील गेल्या २६ दिवसांपासून उपोषणावर होते. मात्र, त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आपले उपोषण सोडले.






