(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
YRF Rah Records: यशराज फिल्म्सने नुकत्याच सुरू केलेल्या ‘राह रेकॉर्ड्स’ या नव्या संगीत लेबलने अवघ्या एका दिवसात आपलं पहिलं ओरिजिनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. गायक-गीतकार अमन याचं ‘जादूगरी’ हे भावस्पर्शी गाणं सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं असून, याच गाण्याद्वारे ‘राह रेकॉर्ड्स’च्या संगीतप्रवासालाही सुरुवात झाली आहे.
‘जादूगरी’ हे प्रेम, विरह आणि नातं हातातून निसटल्यानंतर होणाऱ्या पश्चात्तापावर आधारित भावनिक गीत आहे. हे गाणं अमनने स्वतः लिहिलं असून त्यानेच ते सादर केलं आहे. नात्यातील न बोललेले संवाद, व्यक्त न झालेल्या भावना आणि गृहीत धरलेल्या प्रेमाची जाणीव या गाण्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अमनसोबत अभिनेत्री शिवांगी नेगी झळकली आहे. दोघांमधील सुंदर नात्याच्या आठवणी आणि त्यानंतर वाढत जाणारं भावनिक अंतर याचं प्रभावी चित्रण या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. ‘जादूगरी’ हे शीर्षक प्रेमाच्या त्या जादूचं प्रतीक आहे, ज्याची खरी किंमत ते हरवल्यानंतरच कळते.
‘राह रेकॉर्ड्स’च्या टॅलेंट डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरापासून अमनसोबत सातत्याने काम करण्यात आलं. या काळात त्याने आपल्या गीतलेखनाची शैली अधिक समृद्ध केली आणि स्वतःची स्वतंत्र संगीत ओळख निर्माण केली. अमनच्या माध्यमातून कलाकारांना दीर्घकालीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या ‘राह रेकॉर्ड्स’च्या ध्येयाची सुरुवात झाली आहे.
‘जादूगरी’बद्दल बोलताना अमन म्हणाला, “हे गाणं अतिशय वैयक्तिक भावनेतून जन्माला आलं आहे. अनेकदा एखादं नातं संपल्यानंतरच त्याची खरी किंमत कळते. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही गृहीत धरू नये, हीच भावना या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.”
यापूर्वी अमनचं ‘रोया था’ हे गाणं स्पॉटिफायवर जवळपास ५० लाख वेळा ऐकलं गेलं असून, त्याने भारतातील उदयोन्मुख गायक-गीतकारांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ‘जादूगरी’च्या माध्यमातून तो ‘राह रेकॉर्ड्स’चा पहिला अधिकृत कलाकार ठरला असून, त्याच्या संगीत कारकिर्दीतील नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
Kajol Birthday Special: ‘DDLJ’ ते ‘कुछ कुछ होता है’; ९० च्या दशकात गाजलेले काजोलचे ५ आयकॉनिक चित्रपट






