(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
The Fix Trailer: हॉलिवूडमधील आगामी गुप्तहेर-अॅक्शन थ्रिलर ‘द फिक्स’ (The Fix) चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ‘हॉटेल तेहरान’ (Hotel Tehran) या नावाने ओळखला जात होता.
दिग्दर्शक गाय मोशे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘द फिक्स’ हा चित्रपट अफगाणिस्तानातील एका शोकांत मोहिमेच्या आठवणींनी पछाडलेल्या सीआयए पथकाभोवती फिरतो. अनुभवी एजंट लॅरी (लिअम नीसन) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टकर (झॅकरी लेव्ही) यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तेहरानमधील एका अत्यंत धोकादायक मिशनवर निघते. या मोहिमेत सुटका, रहस्य आणि स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी दडलेली असते.
चित्रपटात एलनाझ नोरोझी ‘झारा’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिची प्रभावी उपस्थिती लक्षवेधी ठरत असून, लिअम नीसन आणि झॅकरी लेव्हीसोबत ती कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसते. तिची भूमिका शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि भावनिकदृष्ट्या तीव्र असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
दमदार स्टारकास्ट
‘द फिक्स’मध्ये टायटस वेलिव्हर, नविद नेगहबान, वेस चॅथम आणि क्विन्सी आयझाया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘सेक्रेड गेम्स’, ‘मेड इन हेवन’ आणि आंतरराष्ट्रीय मालिका ‘तेहरान’मधून ओळख निर्माण केल्यानंतर एलनाझ नोरोझीने ‘कंदहार’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ‘द फिक्स’मधून ती जागतिक स्तरावरील दोन दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असून, तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
इराणमध्ये जन्मलेल्या एलनाझसाठी इराणच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. इराण, जर्मनी आणि भारत अशा तीन देशांमध्ये विस्तारलेल्या तिच्या कारकिर्दीला ‘द फिक्स’मुळे नवी उंची मिळण्याची शक्यता आहे.’द फिक्स’ हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे






