(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’ येत्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी भावनिक आणि उत्कंठावर्धक वळण घेऊन येत आहेत. एका बाजूला दीप, ज्योती आणि स्वराज यांच्या नात्यातील गैरसमज दूर होताना दिसणार आहेत, तर दुसरीकडे जय आणि शरू यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होणार आहे.
‘दीपज्योती’मध्ये ज्योतीच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळात दीप तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. प्रभूच्या माणसांपासून तिचे संरक्षण करण्याबरोबरच तिच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तो ५० हजार रुपयांची मदत करतो. मात्र, याच घटनेचा गैरसमज करून प्रीती दीप आणि स्वराज यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
प्रीतीचा हा डाव काही काळ यशस्वी होताना दिसत असला, तरी अनपेक्षितपणे ज्योतीच दीप आणि स्वराज यांच्यातील गैरसमज दूर करण्याचे कारण ठरते. त्यामुळे तिघांच्या नात्यात नवे वळण येणार असून, दीपच्या निःस्वार्थ पाठिंब्यामुळे ज्योतीचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
‘सनई चौघडे’मध्ये ऑफिसमधील टीम-बिल्डिंग उपक्रमामुळे जय आणि शरू यांच्यातील नातं आणखी घट्ट होताना दिसणार आहे. विश्वासावर आधारित विविध उपक्रमांमधून दोघे पुन्हा एकदा एकमेकांवरील विश्वास सिद्ध करतील.
याचदरम्यान शरू, जयसाठी खास भेटवस्तू घेऊन त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे करते. जय आपल्या भावना व्यक्त करत नसला तरी शरूच्या या कृतीने तो मनापासून भारावून जातो.
मात्र, दुसरीकडे तेजस्विनी शरूला मिसेस चौधरी यांच्यासोबतच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी घेऊन जाते. या भेटीत शरूचा अपमान होतो आणि ती खचून जाते. अशा वेळी जय तिचा आत्मविश्वास वाढवत तिच्या पाठीशी उभा राहतो. या प्रसंगानंतर जय आणि शरू यांच्यातील विश्वास आणि जवळीक आणखी वाढणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
झी मराठीवरील या दोन्ही मालिकांमधील आगामी भागांमध्ये नात्यांची परीक्षा, भावनिक संघर्ष आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.






