सुकामेवा हा शरिरासाठी नेहमीच गुणकारी ठरतो. बदाम, अक्रोड आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्याने त्याचे जास्त फायदे मिळतात, असं सांगितलं जातं. आरोग्य तज्ज्ञ अनेकदा मूठभर ड्रायफ्रूट्स खाऊन दिवसाची सुरुवात करण्याची शिफारस करतात. मनुका किंवा सुकवलेली द्राक्षे विशेषतः पचनास मदत करतात, लोहाची पातळी वाढते आणि हाडे मजबूत राहतात. पोषणतज्ज्ञ भुवन रस्तोगी यांच्या मते, मनुका (raisins Benefits) आरोग्यासाठी फायदेशीर आहे, इतर ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट टिकून राहतात. ते म्हणाले, यामध्ये लोह मध्यम आणि पोटॅशियम जास्त असते. बदलत्या आणि कठोर हवामानात सुका मेवा हा पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे.
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, मनुके (Soaked raisins) हे सुपरफूड आहेत आणि ताज्या द्राक्षांपेक्षा (Fresh Grapes) त्यामध्ये जास्त पौष्टिक मूल्य असतात. मात्र, सामान्यतः मानला जाणारा हा समज दूर करण्यासाठी पोषणतज्ञ रस्तोगी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
मनुके पुन्हा रि-हाइड्रेट करण्याचा काही फारसा फायदा नाही. मनुके भिजवून खाल्ल्याचा फायदा होतो, असं मला कुठंही दिसून आलेलं नाही. या विषयावर कोणतेही महत्त्वाचे संशोधन उपलब्ध नाही. सर्व अभ्यास लेखांमध्ये फक्त मनुक्यांच्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे. मनुके पाण्यात भिजवून खाण्याचे कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाहीत, असे रस्तोगी म्हणतात.
पोषणतज्ज्ञ भुवन रस्तोगी यांनी स्पष्ट केले की, द्राक्षांपेक्षा मनुका आरोग्यासाठी कमी फायदेशीर आहे, कारण जेव्हा द्राक्षे डिहाईड्रेट होतात तेव्हा त्यातील जीवनसत्त्वे कमी होतात. USDA च्या (युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर) पोषण डेटाबेसद्वारे मनुका आणि द्राक्षांचा अभ्यास करून त्यांनी निरीक्षण नोंदवले की, “द्राक्षांमध्ये 15 पट अधिक व्हिटॅमिन के, सहा पट अधिक जीवनसत्त्वे ई आणि सी आणि मनुक्यापेक्षा दोन पट जास्त बी 1 आणि बी 2 जीवनसत्त्वे आहेत.
द्राक्षांपेक्षा मनुका किंवा भिजवलेला मनुका चांगला आहे, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. द्राक्षे तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून मनुके खाणे योग्य आहे. मात्र, द्राक्षांच्या हंगामात मुबलक उपलब्ध असताना द्राक्षेच खाण्यावर भर द्यावा. द्राक्षांपेक्षा मनुक्यांमधून जास्त घटक मिळतात, असे काही नाही. मनुके भिजवून खाण्याचा कोणताही विशेष फायदा नाही, असेही रस्तोगी यांनी म्हटले आहे.