केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला (File Photo : Government) Employees
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामुळे आठव्या वेतन आयोगापूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.
केंद्र सरकारने याआधी जुलै 2024 मध्ये डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 19000 रुपये असेल तर त्याला 10070 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता 2 टक्के वाढीनंतर हा भत्ता 10450 रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 380 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल तर महागाई भत्ता वाढण्यापूर्वी हा महागाई भत्ता 26,500 रुपये होता. त्याचवेळी, आता ते 27,500 रुपये होईल. म्हणजेच 50 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 1000 रुपयांची वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2 टक्के नवीन वाढ 1 जानेवारीपासून प्रभावी मानली जाईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात ते जोडून जानेवारी आणि फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यासाठी महागाई भत्ता दिला जाणार आहे.