देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मनोहरपूर-दौसा महामार्गावर कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक बसली. धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर ट्रेलर पलटी झाला तर कारचा अक्षरश: चुराडा झाला. खाटू श्यामजी मंदिराला भेट देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये सत्य प्रकाश (६०), त्यांची पत्नी रमा देवी (५५), मुलगा अभिषेक (३५), सून प्रियांशी (३०) आणि ६ महिन्यांची नात वेरणा यांचा समावेश आहे.
Maharashtra Political : कोण चंद्रकांत खैरे? छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या नेत्याने पुन्हा डिवचलं
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सत्य प्रकाश यांचं संपूर्ण कुटुंब खाटू श्यामजी येथे आज सकाळी देवदर्शनासाठी निघालं होतं. दरम्यान सकाळी ८ वाजता मनोहरपूर-दौसा महामार्गावर नेकावाला टोल नाक्यानजीक कार आणि ट्रेलरची धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. पाचही कारमध्ये अडकून पडले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिकांना खूप प्रयत्न करावे लागले. प्राथमिक तपासात, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच रायसर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने ट्रेलर बाहेर काढण्यात आला. मृतांचे मृतदेह चांदवाजी येथील एनआयएमएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ट्रेलर चालकाचीही चौकशी करण्यात येत आहे.