हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली (File Photo : Winter)
नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तापमानात घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामांना तोंड देत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पारा गोठणबिंदूच्या खाली गेला आहे.
ईशान्येकडील राज्यात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डिसेंबरमधील थंडी देशाच्या अनेक भागात दिसून येत आहे. उत्तर भारतात सध्या थंडी, प्रदूषण, धुके पाहिला मिळत आहे. कमी तापमान, मंद वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता कमी वातावरणात प्रदूषकांना अडकवते, ज्यामुळे धुके आणि धूर एकत्रितपणे दाट धुके तयार होताना दिसत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या अनेक भागात हा थर जाड होत आहे, ज्यामुळे दृश्यमानता कमी होते आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे.
दरम्यान, सकाळच्या वेळी वायू प्रदूषक सर्वाधिक सक्रिय असतात, ज्यामुळे बाहेर जाणे अधिक धोकादायक बनते. त्यामुळे या राज्यातील लोकांना बाहेर जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठी घट दिसून आली आहे. ईशान्य भारतात जेट स्ट्रीम सक्रिय आहे आणि १३ डिसेंबरपासून हवामान बदलेल.
उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुके
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंडमध्ये थंड हवामान आहे आणि आजही काही प्रमाणात आराम मिळण्याची चिन्हे नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. ज्यामुळे थंडी आणखी तीव्र जाणवणार आहे. डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, रविवारी (दि.१४) उंचावरील भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यामुळे तापमान आणखी खाली येऊ शकते.
पुण्यात काश्मीरसारखी थंडी
महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम असून पुणे शहरात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.
हेदेखील वाचा : Weather Update : उत्तराखंड, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा वाढला कडाका; डोंगराळ भागात बर्फवृष्टी






