मोदी सरकारवर अनेकदा टीका करणारे अभिनेते प्रकाश राज ईडीच्या रडारवर; १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स

केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा कठोर शब्दांत टीका करणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी समन्स बजावले.

  चेन्नई : केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा कठोर शब्दांत टीका करणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी समन्स बजावले.

  पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. छापेमारीनंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली आहे.

  तामिळनाडूच्या त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये पीएमएलए अंतर्गत शोध मोहिमेदरम्यान अशी अनेक कागदपत्रे सापडली ज्यामध्ये सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती आढळली. एवढेच नाही तर ईडीने झडतीदरम्यान ११ किलो ६० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले. प्रणव ज्वेलर्सच्या लोकांनी अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून सोने योजनेतून जनतेकडून गोळा केलेले १०० कोटी रुपये गुंतवल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

  ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की प्रणव ज्वेलर्स आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूक करून घेतलेले पैसे दुसऱ्या शेल कंपनीकडे वळवले होते. राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात.

  जनतेची फसवणूक

  ईडीने म्हटले की, तपासात असे दिसून आले आहे की प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधित व्यक्तींनी सराफा/सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावाखाली सार्वजनिक निधी बनावट संस्था/अॅक्सेस प्रदात्यांकडे हस्तांतरित करून जनतेची फसवणूक केली आहे.