तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजप नेते दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांवर सुरू असलेल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.

    कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांवर सुरू असलेल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त बीरभूम आणि वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.

    ईव्हीएम बिघाड झाल्याचा आणि एजंटांना मतदान केंद्रांवर प्रवेश करण्यापासून रोखल्याचा आरोप करणाऱ्या विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत 1,088 तक्रारी दाखल केल्या आहेत. वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील सुसुनिया भागात दुपारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये हाणामारी झाली, जेव्हा भाजपाचे उमेदवार दिलीप घोष मतदान केंद्रावर अनियमिततेची तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक बूथवर जात होते.

    तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी घोष यांचा ताफा अडवला आणि त्यांच्या वाहनासमोर निदर्शने सुरू केली. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे घोष यांच्या ताफ्यामागे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काही गाड्यांचे नुकसान झाले.

    मतदानादरम्यान हिंसाचार

    तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोष यांना मारहाण केल्याचे ते म्हणाले. घोष पत्रकारांना म्हणाले, तृणमूलने दहशत पसरवली आहे. सकाळपासून, तृणमूलचे गुंड पोलिंग एजंटवर हल्ला करत आहेत आणि मतदानमुक्त आणि निष्पक्षपणे होऊ देत नाहीत. तृणमूल काँग्रेसने भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले आणि दावा केला की घोष पराजय अनुभवत आहेत आणि या जागेच्या दुर्गापूर भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये हाणामारी झाली.