NIA Raid
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भूपतीनगर येथे ‘एनआयए’ च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोन अधिकारीही जखमी झाले होते. आता या घटनेत तपासासाठी गेलेल्या ‘एनआयए’ च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही तासांनंतर आता पोलिसांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर पोलिसांनी शनिवारी रात्री भूपतीनगर पोलिस ठाण्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. एनआयए अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डिसेंबर 2022 च्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातील तपास करण्यासाठी एनआयएचे एक पथक भूपतीनगरमध्ये दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यासंदर्भात काहींना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाही.