File Photo : BJP
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना ओडिसातून उमेदवारी जाहीर झाली. एकूण ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा या यादीत करण्यात आली. यात मध्य प्रदेशमधून माया नारोलिया यांना राज्यसभेवर पाठविले जाणार आहे. याशिवाय बन्सीलाल गुर्जर, उमेश नाथ महाराज यांना मध्यप्रदेशातून संधी देण्यात आली.
भाजपने अनेक खासदारांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिलेली नाही. मात्र, अश्विनी वैष्णव, सुधांशु त्रिवेदी हे ज्येष्ठ नेते याला अपवाद ठरले आहे. यावेळी भाजपने अनेक नवीन उमेदवारांना संधी दिली. त्यात काहींना संसदीय राजकारणाचा अनुभवही नाही. यातील अनेक उमेदवार पक्ष संघटनेत काम करणारे आहेत. जुन्या अनुभवी सदस्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
बन्सीलाल गुर्जर हे भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्याशिवाय उमेश नाथ महाराज संत यांचे मध्यप्रदेशात शेकडो अनुयायी आहेत. भाजपच्या यादीत माया नारोलिया या एकमेव महिला उमेदवार आहेत. मध्य प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष राहिलेल्या असून, जाट समाजाचे नेतृत्व आहे. त्या मध्य प्रदेशच्या होशंगाबादच्या नगराध्यक्ष होत्या.