"बापाचा माल आहे का?" कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे
देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला (CJP आंदोलन) मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून आंदोलनाची ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनामा मागणीसंदर्भात “बापाचा माल आहे का?” म्हणत टीका केली आहे.
दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आज (सोमवार, 20 जुलै ) दिल्लीत मोठे आंदोलन होत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.”
कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने… — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 19, 2026
अतुल भातखळकरांच्या वक्तव्याला आता मोठा विरोध होत असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे तसेच लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा आणि राजीनाम्याची मागणी करण्याचाही अधिकार संविधानाने दिला असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ‘X ‘ वर पोस्ट करत अभिजित दिपकेंवर टीका केली. ते म्हणाले, “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे. NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…”
अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे.
NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…… pic.twitter.com/D4WdS4hYqZ — Prasad Lad (@PrasadLadInd) July 19, 2026
एकीकडे सत्ताधारी या शांतीपूर्ण आंदोलनाला विरोध करत आंदोलकांवर टीका करत आहेत. तर, विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असल्याचे दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या टीकेला आता विरोधक तसेच सामान्य लोकांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली असून लोकशाहीत शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असल्याची आठवण सत्ताधाऱ्यांना करून देण्यात येत आहे.






