सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा साधला संवाद; म्हणाले, ‘पक्ष संपवण्याचा प्रयत्न…’

काल तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज लगेचच प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्याचबरोबर जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे.

    दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केली होती. त्यामुळे आपच्या लोकसभा निवडणूक प्रचारावर परिणाम झाला होता. सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी केजरीवालांना जामीन दिला आहे. काल तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज लगेचच प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्याचबरोबर जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे.

    कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेत अरविंद केजरीवाल यांनी दिवसाची सुरुवात केली. बजरंगीबलीची त्यांच्यावर कृपा असल्याचे देखील केजरीवाल म्हणाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, ‘आत्ताच मी, माझी पत्नी आणि भगवंत मान कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात गेलो होतो. तेथे आशीर्वाद घेतले. बजरंगबलीने आपल्यावर खूप आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या कृपेने आज मी तुमच्यामध्ये आहे. निवडणुकीच्या वेळी तुरुंगातून सुटून मी तुमच्यामध्ये येईन, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती. आमचा आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. आम्ही दोन राज्यात आहोत. हा पक्ष 10 वर्षे जुना आहे, पण आमच्या पक्षाला चिरडून टाकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले.

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमच्या पक्षाच्या चार प्रमुख नेत्यांना एकाच वेळी तुरुंगात पाठवण्यात आले. मोठ्या पक्षांचे चार प्रमुख नेते तुरुंगात गेले तर पक्ष संपला असता. त्यांना वाटत होते की पक्ष संपेल पण हा पक्ष नाही, हा एक विचार आहे आणि तो वाढत आहे. 75 वर्षात इतर कोणत्याही पक्षावर किंवा त्यांच्या नेत्यावर एवढा त्रास झालेला नाही. जेवढा आम आदमी पार्टी आणि त्यांच्या नेत्यांवर झाला आहे. 2015 मध्ये आम्ही स्वतः आमच्या एका मंत्र्याला सीबीआयच्या ताब्यात दिले. पंजाबमध्ये मला कळले की माझा एक मंत्री पैसे मागत होता. आम्ही त्याला उचलून तुरुंगात पाठवले. असे स्पष्ट मत आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.