मालदा : एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये सामील पक्षांमधील दरी वाढताना दिसत आहे. आताच्या घडीला पश्चिम बंगाल, बिहार येथून भारत जोडो न्याय यात्रा जात आहे.
विशेष म्हणजे ज्या भागातून भारत जोडो न्याय यात्रा गेली, तेथील एका भागात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, सीपीआयएम आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी तयार राहावे, अशा सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री ममता यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला.
यानंतर आता काँग्रेस आणि तृणमूलमधील चर्चेची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-सीपीआय (एम)-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र राहायला हवे, असे सांगत तृणमूलच्या विजयाचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 1 फेब्रुवारीपर्यंत राज्याची थकबाकी न भरल्यास 2 फेब्रुवारीपासून कोलकाता येथे आंदोलन करण्याची घोषणा ममतांनी केली. मालदा येथील सार्वजनिक वितरण कार्यक्रमात बॅनर्जी यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पैसे न दिल्याने प्रभावित झालेल्या लोकांना धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.