हवालदाराच्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीवर PSI ने केला बलात्कार; पीडितेच्या आईने आरोपीला चांगलंच चोपलं

राजस्थानातील दौसा येथे एका सब इन्स्पेक्टरने पोलिस हवालदाराच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याची संतापजक घटना उघडकीस आली. यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यात एकच गोंधळ घातला आणि तोडफोड केली.

    जयपूर : राजस्थानातील दौसा येथे एका सब इन्स्पेक्टरने पोलिस हवालदाराच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याची संतापजक घटना उघडकीस आली. यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यात एकच गोंधळ घातला आणि तोडफोड केली. आरोपीने स्वतःला पोलिस ठाण्यातच एका खोलीत कोंडून घेतले होते. मात्र, जमावाने पोलिस ठाण्याच्या (Jaipur Police) खिडकीची काच तोडून आरोपीला बाहेर काढले आणि मारहाण केली.

    पोलिसांनी आरोपी पीएसआय भूपेंद्रसिंह याला रात्री उशिरा ताब्यात घेतले. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा या मुलीला दौसा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर दौसा एसपी वंदिता राणा यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती सामान्य असून तिला गंभीर दुखापत झालेली नाही.

    पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. त्याच्या गैरवर्तणुकीचा अहवाल पोलिस महानिरीक्षक (जयपूर ग्रामीण) यांच्याकडे पाठवण्यात आला असून, ते पुढील कारवाई करतील.

    लालसोट भागात आरोपी सब-इन्स्पेक्टर भूपेंद्रसिंह याने 5 वर्षीय पीडितेला आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याला घेराव घालून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजप खासदार किरोरीलाल मीणा यांनीही घटनास्थळी जाऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून विरोधी भाजपाने पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.