आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने जगभरात “हर घर तिरंगा”, “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला जात असून देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील लाल किल्यावर ध्वजारोहण केले.
सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास पंतप्रधानानी राजघाट ला भेट देऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. लालकिल्यावर नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना तीन ही सैन्यदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यानंतर ७:३० च्या सुमारास लालकिल्यावर ध्वजवंदन करून त्यांनी समस्त भारत वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी म्हंटले की, “भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभराती पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
#WATCH PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day pic.twitter.com/VmOUDyf7Ho
— ANI (@ANI) August 15, 2022
तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या महिला योद्धांना देखील यावेळी पंतप्रधानांनी अभिवादन केले. पंतप्रधानांनी म्हणाले की, “भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल अशा अनेक पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन.”