नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील अतिक अहमद (Atiq Ahmed) या राजकारणी आणि गुन्हेगारी विश्वातील नाव निर्माण केलेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पण अतिक अहमदच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांची माहिती मिळत आहे. मात्र, अतिक अहमदपेक्षा जास्त खतरनाक, धोकादायक नाव म्हणजे मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) हे आहे.
मुख्तार अन्सारी हे नाव देखील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात नावांपैकी एक आहे. अतिक अहमदपेक्षाही खतरनाक असल्याचे खुद्द पोलीस अधिकारीच सांगत आहेत. याबाबत गाझीपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर जयस्वाल यांनी नव्वदच्या दशकातील आठवण करत मुख्तार अन्सारीबाबत अनेक बाबींचा उलगडा केला.
त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ही घटना 27 फेब्रुवारी 1996 ची आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. पदवी महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका सुरू होत्या. त्यावेळी एका वाहनातून शस्त्रे घेऊन काही लोक येत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्या गाडीमध्ये मुख्तार अन्सारी स्वत: होता. त्यावेळी ‘मुख्तार अन्सारी याने पोलिसांनी जीप थांबवल्यावर वाद घालण्यास सुरुवात केली. ‘मुख्तारचे वाहन तपासण्याचा अधिकार कोणाला आहे. असे म्हणत त्याने गोळीबार सुरू केला’.
मुख्तारची गाडी पंक्चर
पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मुख्तार अन्सारीच्या गाडीचे चाक पंक्चर झाले. त्यावेळी गाडीतून उडी मारलेल्या एका व्यक्तीला गोळी लागली. पण मुख्तार न थांबताच तसाच गाडी घेऊन पळून गेला. त्यावेळी आम्ही जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. मुख्तार अन्सारी हा कधीही पलटू शकतो. त्याच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये, असे देखील या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.