पंतप्रधान मोदींविरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल 17 हजार तक्रारी; जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या कथित मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या कथित मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. 17 हजारांवर नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून या वक्तव्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डॉ. सिंग यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन काँग्रेस सर्व संपत्ती मुस्लिम समाजाला देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांचे भाषण वस्तुस्थितीला धरून नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले व त्यावेळची चित्रफीत व्हायरल केल्यानंतर सर्व विरोधी पक्षनेते व समाजातील सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

    निवडणूक आयोगाचे मौन

    निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी विभागाला याबाबत विचारणा केल्यानंतर यावर केंद्रीय निवडणूक आयोगाला काहीही बोलायचे नाही, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने दिलेल्या निवेदनावरही कोणताही प्रतिक्रिया निवडणूक आयोगाने दिली नाही.