लंडनमध्ये भारतीय निदर्शकांसमोर पाकिस्तानी राजदूताचे घृणास्पद कृत्य (फोटो सौजन्य-X)
Pahalgam Terrorist Attack News Marathi: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय वंशाच्या शेकडो लोकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. यावेळी, एका वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने निदर्शकांकडे हाताने हातवारे करून आगीत तेल ओतले. एका हातात भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर आणि दुसऱ्या हातात चहाचा कप घेऊन पाकिस्तानी अधिकाऱ्याने निदर्शने करणाऱ्या भारतीयांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गळा चिरडणाऱ्या या हावभावाबद्दल इंटरनेट वापरकर्ते पाकिस्तानी अधिकाऱ्यावर जोरदार टीका करत आहेत. व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, अनेक सोशल मिडिया युजर्सने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आणि राजनयिकांमध्ये सौजन्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. अशा पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांकडून सामान्य सौजन्य अपेक्षित असते, परंतु पाकिस्तानचे राजनयिक आणि लष्करी अधिकारी अशिक्षित असल्याचे दिसून येते.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळावर बॉम्बहल्ला करून तो उद्ध्वस्त केला होता. दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानी हवाई दलाने सीमेवर काही धाडस दाखवले, ज्याला भारतीय हवाई दलाने योग्य उत्तर दिले. दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये झुंज सुरू झाली.
भारतीय हवाई दलाचे शूर वैमानिक अभिनंदन वर्धमान यांनी त्यांच्या मिग-२१ बायसन लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानाला आव्हान दिले आणि ते पाडले. या लढाईदरम्यान, अभिनंदन नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेले आणि त्यांचे विमान कोसळले. अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. पण भारताच्या भीतीमुळे त्याला वाघा बॉर्डरने दोन दिवसांनी सोडण्यात आले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जेमतेम एका आठवड्यानंतर, एका पाकिस्तानी अधिकाऱ्याचा गळा चिरण्याचा हावभाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेक सोशल मिडिया युजर्सने व्हिडिओमध्ये दिसणारा लष्करी अधिकारी तैमूर राहत म्हणून ओळखला, जो पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात होता. लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय आणि ज्यू समुदायाच्या ५०० हून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन पहलगाम हत्याकांडाविरुद्ध आवाज उठवला.
पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर एका भारतीय-ज्यू निदर्शकांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही भारताचे समर्थन करतो कारण आपण एकाच शत्रूचा सामना करत आहोत: इस्लामिक कट्टरतावाद.” पहलगाममध्ये घडलेल्या घटनेने आपल्याला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. पहलगाम हल्ल्याचा जगभरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. वाचलेल्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, दहशतवाद्यांनी हिंदू पुरुष पर्यटकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
गळा चिरणारा हावभाव करणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध करताना दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी पाकिस्तानला आधी आपला मान वाचवण्याचा इशारा दिला. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘पाकिस्तान आणखी काय करू शकते? त्याच्या डोक्यावर एक संकट कोसळत आहे. तरीही त्यांचे अधिकारी निष्पाप लोकांचा शिरच्छेद करण्याची धमकी देत आहेत. दूतावासाबाहेर धमक्या देणाऱ्यांना एक-एक करून ओळखले जाईल. इंग्लंडमध्येही त्याला जाब विचारला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.