‘तर मी संन्यास घेईन …’, नितीश कुमारांच्या यू-टर्नवर प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल ; मंत्रिपदाच्या जागांबाबत पुन्हा केले भाकीत

प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी आज महाआघाडीशी संबंध तोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार लवकरच शपथ घेणार आहेत.

    बिहारमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी जन सूरजमधून मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आजच्या घटनेने नितीशकुमारच नाही तर बिहारमधील सर्व पक्ष ‘पलटूराम’ असल्याचे सिद्ध झाले आहे. एवढेच नाही तर 2025 च्या निवडणुकीतही ही युती टिकू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. या घटनेमुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. (Prashant Kishor attacks Nitish Kumar over u turn in Bihar)

    प्रशांत किशोर म्हणाले, नितीशकुमार धूर्त आहेत. बिहारच्या जनतेची फसवणूक करत आहेत मात्र बिहारचे लोक व्याजासह याची परतफेड करतील. प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार कोणत्याही आघाडीतून लढले तरी पुढील विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या पक्षाला २० जागाही मिळणार नाहीत. ते पुन्हा निवडून आले  तर मी माझ्या कामातून निवृत्ती घेईन.

    यापूर्वी नितीश कुमारांवर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाचही जागा मिळणार नाहीत. पाचपेक्षा जास्त जागा मिळाल्यास मी जाहीर माफी मागेन.

    नितीश कुमार यांचा राजीनामा

    रविवारी एक मोठे पाऊल उचलत नितीश कुमार यांनी महाआघाडीशी संबंध तोडून भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा जाहीर केला आणि त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.