rahul gandhi- narendra modi
गुजरात: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्यानंतर आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारल्यानंतर, काँग्रेसमध्ये पक्षाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते उत्साहात आहेत. अशातच गुजरात दौऱ्यावर असताना शनिवारी (6 जुलै) आपण अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसा आपण गुजरातमध्येही भाजपचा पराभव करू, अशी गर्जनाच केली आहे.
अहमदाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपने आम्हाला धमक्या देऊन आणि आमच्या कार्यालयाचे नुकसान करून आव्हान दिले आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी आमचे कार्यालय फोडले तसेच आम्हीही त्यांचे सरकार फोडणार आहोत. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अध्योध्येत त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करेल हे लिहून ठेवा.
मात्र, राहुल गांधींनी असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशा गोष्टी बोलल्या होत्या. निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी विजय मिळत असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळचे निकाल पाहिले असता त्यावेळी भाजपने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 1, भारतीय आदिवासी पक्ष 2 आणि 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधानपदावर असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही.
2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी असाच दावा केला होता. गुजरातच्या जनतेने यावेळी भाजपला सत्तेवरून हटवण्याचे ठरवले आहे. पण त्यावेळच्या निवडणूक निकालांनी काँग्रेसची झोप उडवली. भाजपला 156 जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर आम आदमी पक्ष 5 जागा आणि इतर पक्षांना 4 जागा मिळाल्या.
आता 2027 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यासाठी राहुल गांधींनी आतापासूनच राज्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच क्रमाने गुजरातमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर जुने आकडे वेगळेच चित्र मांडत आहेत. गेल्या वेळची आकडेवारी आणि आता ते करत असलेला दावा पाहता राहुल गांधी गुजरात जिंकण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.