"पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार," राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ
सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटत आहेत.”असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. याशिवाय, “शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत, पंतप्रधान हास्यास्पद व्हिडिओ बनवत आहेत, आणि भाजप टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे.” अशी सणसणीत टिकाही केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील एका हलक्याफुलक्या प्रसंगामुळे ‘मेलोडी’ टॉफी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मोदी यांनी ‘Melody’ टॉफीचे पॅकेट भेट दिले. त्यानंतर मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “गिफ्टसाठी धन्यवाद” असे म्हटले. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी निळ्या रंगाच्या बंदगळा सूटमध्ये दिसत होते, तर जॉर्जिया मेलोनी यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
मोदी आणि मेलोनी यांच्या नावांवरून तयार झालेला ‘#Melodi’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा हॅशटॅग प्रथम 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या COP-28 परिषदेदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी वापरला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण भेटी आणि सोशल मीडिया पोस्टमुळे हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मेलोनी यांनी त्यावेळी मोदींसोबतचा फोटो शेअर करत ‘Melodi’ हा हॅशटॅग वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या नावाभोवती अनेक मीम्स आणि पोस्ट्स व्हायरल होऊ लागल्या.
इटली दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची डिनर बैठकीत भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून रोममधील प्रसिद्ध कोलोसियमला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या शैलीला ‘कार डिप्लोमसी’ असे म्हटले जाते. जागतिक नेत्यांसोबत एकाच वाहनातून प्रवास करून परस्पर मैत्री आणि सहकार्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न मानला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 ते 20 मे दरम्यान संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते रोम येथे पोहोचले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीत व्यापार, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.






