राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच भजनलाल यांचा दणका; गहलोत सरकारची ‘ही’ योजनाच केली बंद

राजस्थानमधील नव्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारची राजीव गांधी युवा मित्र इंटर्नशिप योजना बंद केली आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत 2 वर्षात 5 हजार तरुणांना प्रशिक्षण मिळाले.

    जयपूर : राजस्थानमधील नव्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारची राजीव गांधी युवा मित्र इंटर्नशिप योजना बंद केली आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत 2 वर्षात 5 हजार तरुणांना प्रशिक्षण मिळाले. या अंतर्गत गहलोत सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यात आला होता, ज्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत.

    माजी मुख्यमंत्री गहलोत यांची ही एक आवडती योजना होती. ही योजना बंद केल्याने राज्यातील 50 हजार तरुण बेरोजगार होणार आहेत. गहलोत म्हणाले की, या तरुणांना सरकारी योजनांची माहिती आहे आणि ते सरकारला खूप मदत करत आहेत. नव्या सरकारला या योजनेच्या नावात अडचण आली असती तर राजीव गांधी सेवा केंद्रांप्रमाणेच या योजनेचे नाव अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर बदलता आले असते.

    बेरोजगारीची पहिली भेट : दोतासरा

    प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविद सिंग दोतासरा म्हणाले की, राजस्थानच्या भाजप सरकारने नवीन वर्षाच्या आधीच इंटर्नशिप कार्यक्रम संपवून हजारो राजीव गांधी युवा मित्रांना बेरोजगारीची भेट दिली आहे. भाजपचा राजकीय द्वेष फक्त नावात असता तर त्यांनी नाव बदलले असते, पण त्यांनी तरुणांना बेरोजगार का केले? मागील भाजप सरकारमध्ये पंचायत सहाय्यक नेमण्यात आले होते, आमचे सरकार आल्यावर त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना कायम करण्याचा प्रयत्न झाला.