दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरी प्रकरण (फोटो- टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि 12 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान चेंगराचेंगरीशी संबंधित याचिकेवर विचार करण्यास ससुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. दिल्लीत स्टेशनवरील चेंगराचेंगरी प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत 200 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर आज कोर्टात सुनावणी पार पडली.
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गर्दी नियंत्रणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठसमोर याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाला विचारले, “२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?”
सुप्रीम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर याचिकाकर्ते वकील म्हणाले, रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले होते आणि रेल्वेने तेथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांना नोटीस बजावल्या आहेत.
शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत भाविकांची मोठी गर्दी उभी होती आणि इतर प्रवासीही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रेल्वेने अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून एक विशेष ट्रेन येण्याची घोषणा केली. यानंतर, घोषणेनंतर आधीच प्लॅटफॉर्म १४ वर जाण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म १६ च्या दिशेने धावले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. आणि लोक एकमेकांवर तुटू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले यांचा समावेश आहे जे बिहार, दिल्ली आणि हरियाणाचे रहिवासी होते. या घटनेनंतर रेल्वेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
ही दुर्घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर घडली. मृतांमध्ये बहुतेक लोक बिहार आणि दिल्लीचे होते. बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणामधील १ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी अपघाताचे प्राथमिक कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ मधील पायऱ्यांवर एक प्रवासी घसरला आणि पडला. त्याच्या मागे असलेल्या अनेक प्रवाशांना त्याची धडक बसली आणि ही दुःखद घटना घडली.