तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
Telangana Accident News Marathi : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 70 हून अधिक प्रवासी असलेल्या बसची ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या 12 हून अधिक आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोहून येणारी आरटीसी बस थेट खडी भरलेल्या टिप्पर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. बस आणि टिप्पर ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमधील खडी बसमध्ये पडली आणि अनेक प्रवासी अडकले. टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते.
या धडकेमुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढून चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य कोणत्याही परिस्थितीत जलदगतीने पूर्ण केले पाहिजे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार दिले पाहिजेत.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना तात्काळ हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचारांची कमतरता भासू नये आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती ठेवण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळाजवळील मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासनाला सर्व शक्य ती मदत पुरवण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम रेड्डी यांनी रंगारेड्डी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून बाधित लोकांना त्वरित आणि प्रभावी मदत मिळू शकेल.






