यूपीच्या प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणारा बांदा शूटर लवलेश तिवारीचे सोशल मीडिया खाते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लवलेश तिवारी नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करताना लिहिले होते, ‘फैन्स तो सिलिब्रेटी के होते हैं मेरे तो चाहने वाले हैं: महाराज लबलेश तिवारी.’ यानंतर युजर्सनी या पोस्टला खूप पसंती दिली आणि त्यावर विविध प्रकारे कमेंट्स केल्या. कोणी त्याला शेर म्हणत आहेत तर कोणी वेगळंच.
लवलेशच्या प्रोफाईलवरून पोस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.एसपींनी सायबर सेलला तपासाचे आदेश दिले आहेत. या फेसबुक अकाऊंटवर डीपी लवलेशचे आणि पालकांचे फोटो टाकण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत हे खाते लवलेश तिवारी यांचेच असल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गेल्या 16 एप्रिलनंतर या खात्यावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. यानंतर 12 मे रोजी खात्यातून पोस्ट करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की जर हे खाते लवलेश तिवारीचे असेल तर ते तुरुंगात असताना त्यावर पोस्टींग कशा झाल्या?
या प्रश्नाबाबत लवलेशच्या कुटुंबीयांची प्रतिक्रीया घेतली असता, त्यांनी हे खाते अतिकच्या हत्येतील आरोपींचे असल्याचे मान्य केले. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर हे खाते लवलेशचे आहे की नाही, हे निश्चित होईल. जर ते लवलेशचे असेल तर ते कोण चालवते?
बांदा येथील एसपी अभिनंदन म्हणाले की, या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. सायबर सेलला तपासाच्या सूचना दिल्या आहेत. हे खाते कोण चालवत आहे हे तपासले जात आहे. चौकशीअंती पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.