अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यामध्ये गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले करणार असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अल कायदाने ही धमकी दिली आहे.
“पैगंबरांच्या सन्मानासाठी लढण्यासाठी” दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार करू, असे अल कायदाच्या पत्रात म्हटले आहे. त्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधू. भगव्या दहशतवाद्यांना आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांच्या अंताची वाट पहावी लागेल, असाही त्यात इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने चर्चेदरम्यान इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माफी किंवा दयामाया होणार नाही. कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा दु:ख या शब्दाने हे प्रकरण बंद केले जाणार नाही. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ, असेही अल कायदाने पुढे म्हटले आहे. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. यानंतर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.
भारताप्रती आक्रमक विचारसरणी – गझवा-ए-हिंद मासिकाच्या नावात समाविष्ट करण्यात आलेले दहशतवादी आणि कट्टरपंथी गटांची भारताप्रती आक्रमक विचारसरणी दिसते. भारतीय उपखंडात मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यात मोठे युद्ध होईल, असा इस्लामिक कट्टरतावादी गटांचा विश्वास आहे. यात मुस्लिम जिंकतील आणि संपूर्ण उपखंड काबीज करतील. पाकिस्तानातील बहुतांश दहशतवादी नेते आणि धार्मिक नेते गझवा-ए-हिंदचा हवाला देऊन मुस्लिमांचा भारताविरुद्धच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.






