
Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्यातच आता पंतप्रधान मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय, कुर्नूलमध्ये सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही ते सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमला भेट देऊन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करतील. आंध्र प्रदेशात पोहोचल्यानंतर पंतप्रधान सकाळी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानात पूजा करतील. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एकाच संकुलात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे सहअस्तित्व, ज्यामुळे ते संपूर्ण देशातील अशा प्रकारच्या एकमेव मंदिरांपैकी एक बनले आहे.
16 ऑक्टोबर 2025 07:29 PM (IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये एक महत्वाचे नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बिहार निवडणूक जिकण्यासाठी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
16 ऑक्टोबर 2025 07:16 PM (IST)
भारतीय ऑटो बाजार बाईक्सच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. शहरी भागात तर बाईकचा वापर होतोच. मात्र, यासोबतच ग्रामीण भागातही बाईकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळेच अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या शहरी भागांसह ग्रामीण भागातही उत्तम बाईक पोहोचाव्यात याबद्दल प्रयत्न करत असतात. खरंतर, ग्रामीण भारतात, बाईक ही फक्त एक राईड नाही तर ती दैनंदिन गरज आहे. खडबडीत रस्ते, शेती आणि गावातील खडबडीत भूभागातून प्रवास करण्यासाठी मजबूत, इंधन-कार्यक्षम आणि कमी देखभालीची बाईक आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या बजेट फ्रेंडली बाईकच्या शोधात असाल. तर आज आपण ग्रामीण भागासाठी बेस्ट पाच बाईकबद्दल जाणून घेऊयात.
16 ऑक्टोबर 2025 06:49 PM (IST)
नवी दिल्ली: भारताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या कोणत्याही संभाषणाची त्यांना माहिती नाही. त्यांनी सांगितले, “मला काल दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या कोणत्याही फोन कॉल किंवा संभाषणाची कोणतीही माहिती नाही.” ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना असा दावा केला होता की, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
16 ऑक्टोबर 2025 06:39 PM (IST)
कॅनडातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. या कॅफेवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, ज्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह… मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लन आज सरे येथील कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या तीन गोळ्यांची जबाबदारी घेतो.”
16 ऑक्टोबर 2025 06:23 PM (IST)
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटण्याच्या घटना वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २४ मोबाईल व चाकू जप्त केले आहेत.
16 ऑक्टोबर 2025 06:09 PM (IST)
केंद्र सरकार आणि सुरक्षा दलांना नक्षलवादाच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, आज सुमारे १७० नक्षलवाद्यांनी प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे गृहमंत्र्यांनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे वचन पुन्हा दिले.
16 ऑक्टोबर 2025 05:55 PM (IST)
मुंबई: दिपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन दीपावली सण साजरा करावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर 2025 05:50 PM (IST)
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने केलेल्या डिबेंचर रक्कम कपातीवरून जिल्ह्यातील संस्थाचालक आक्रमक झालेतं. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थाचालकांनी गोकूळवर धडक मोर्चा काढला..दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहपासून गायीम्हैशींसह जवाब दो मोर्चा काढून गोकूळ संघाच्या कार्यालयावर धडक दिली..मोर्चा गोकूळच्या कार्यालयावर धडकताच आंदोलकांना गेटवर अडवल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली..त्यामुळे या परिसरात काही काळ तणावचं वातावरण निर्माण झालं होतं..त्यानंतर जनावरांसह आंदोलकांनी कार्यालयाच्या दारात जावून गोकूळ प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली..गोकुळ दूध संघाने दूध संस्थाकडून 40 टक्के डिबेंचर रक्कम कपात केली आहे..त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही म्हणत गोकूळने कपात केलेली डिबेंचर रक्कम परत करण्याची मागणी संस्था चालकांनी केली.
16 ऑक्टोबर 2025 05:45 PM (IST)
रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भातशेती पाण्याखाली गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, पिकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतकरी वर्गात चिंता आणि नैराश्याचे वातावरण आहे. बळीराजाने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आमचे प्रतिनिधी पियूष भोसले यांनी या परिस्थितीचा स्थानिक स्तरावर सखोल आढावा घेतला आहे.
16 ऑक्टोबर 2025 05:40 PM (IST)
ठाण्यात दिवाळीच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या पुढाकाराने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते सुमारे 2,500 कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप करण्यात आली.
16 ऑक्टोबर 2025 05:35 PM (IST)
दीपावलीच्या तोंडावर संगमनेर सहकारी साखर कारखान्यात मोठा वाद उफाळून आला आहे. कारखान्याच्या मृत सभासदांच्या वारसांना हक्काची साखर मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते संतोष रोहम यांनी प्रशासनावर केला आहे. संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत रोहम यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. कारखान्याने वारसांना ३० किलो साखर देण्यासाठी जाचक अटी लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
16 ऑक्टोबर 2025 05:30 PM (IST)
पनवेल ग्रामीण ( वा ) कळंबोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येने नागरिकांचे अक्षरशः हाल झाले असून, या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील सेक्टर 3, सेक्टर 10 आणि नावडे परिसरातील नागरिकांनी यापूर्वी सिडको कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतानाच सत्ताधारी भाजपकडूनच आज आंदोलन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर येथील अधिकाऱ्यांना साडी व बांगड्या देऊन त्यांचा निषेध केला जाणार असल्याचे आंदोलनादरम्यान समोर आले.
16 ऑक्टोबर 2025 05:27 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल सोनिया राज सूद यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेत रायगडच्या जिल्हाधिका-यांनी महाराष्ट्र कृषी जमीन (सीलिंग इन होल्डिंग्ज कायदा, 1961) लागू करण्यात केलेल्या कथित अक्षमतेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. अलिबाग येथे घेतलेल्ल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जिल्हाधिका-यांनी हा कायदा लागू करावा अशी मागणी अलिबाग येथील अॅड. मंगेश गजानन घोणे यांच्या न्याय सबका अधिकार या सामाजिक संस्थेमार्फत भूमिहीन लोकांना जमिन मिळण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्यामध्ये सहकार्य करण्यासाठी अॅड. सुद यांनी आजची पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
16 ऑक्टोबर 2025 05:22 PM (IST)
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे. हा सामना शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात हॅरी ब्रूक इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. संघाने फलंदाजीच्या क्रमात काही बदल देखील केले आहेत. फिल साल्ट आणि जोस बटलर सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि संघ त्यांच्याकडून जलद सुरुवातीची अपेक्षा करणार आहे.
16 ऑक्टोबर 2025 05:05 PM (IST)
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (इटर्नल लिमिटेड) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) ₹६५ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही ६३% घट आहे. Q2FY25 मध्ये, कंपनीला ₹१७६ कोटींचा नफा झाला. जुलै-सप्टेंबर तिमाहीत, कंपनीने गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ₹४,७९९ कोटी (अंदाजे तीन पट) वरून ₹१३,५९० कोटी (अंदाजे तीन पट) महसूल मिळवला. महसूल म्हणजे वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम.
16 ऑक्टोबर 2025 04:56 PM (IST)
Share Market Closing Bell Marathi News: आशियाई बाजारातील तेजीमुळे गुरुवारी (१६ ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे आणि व्यापक बाजारात खरेदी झाल्यामुळे बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-५० आणि सेन्सेक्स एक टक्क्यांहून अधिक वाढले.
16 ऑक्टोबर 2025 04:43 PM (IST)
Priyank Kharge on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) उपक्रमांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून कर्नाटकात देशव्यापी गदारोळ सुरू झाला आहे. सिद्धरामय्या सरकारने सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, सार्वजनिक मैदाने आणि इतर राज्य सरकारी जमिनींवर आरएसएस शाखा आयोजित करण्यास मनाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
16 ऑक्टोबर 2025 04:32 PM (IST)
Ayodhya Deepotsav 2025: उत्तर प्रदेश : दिवाळीचा सण जवळ आला असून संपूर्ण देशामध्ये चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठा सजल्या असून भेटवस्तू, आकाशदिवा आणि मिठाईची जोरदार खरेदी सुरु आहे. हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जाणारी दिवाळी ही दिव्यांचा सण म्हणून ओळखली जाते.
16 ऑक्टोबर 2025 04:21 PM (IST)
Bihar Election 2025 News in Marathi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जवळचे विश्वासू आणि जेडीयूचे वरिष्ठ नेते केसी त्यागी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी दावा केला की, सर्व भाजप नेत्यांनी एकमताने घोषणा केली आहे की निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील.
16 ऑक्टोबर 2025 04:14 PM (IST)
Vladimir Putin to Visit India Soon : नवी दिल्ली/मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, येत्या डिसेंबर महिन्यात ५ ते ६ डिसेंबरला पुतिन भारतात येऊ शकतात.
16 ऑक्टोबर 2025 04:01 PM (IST)
राईट्स लिमिटेड (RITES) तर्फे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 600 पदांवर नियुक्ती केली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत RITES च्या अधिकृत संकेतस्थळावर [rites.com](https://rites.com) माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता म्हणून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एस अँड टी, मेकॅनिकल, केमिकल या शाखांमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. रसायनशास्त्र विषयासाठी पूर्णवेळ बी.एससी. पदवी आवश्यक आहे. संबंधित विषयात उच्च पात्रता (डिग्री किंवा पदव्युत्तर पदवी) असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
16 ऑक्टोबर 2025 03:59 PM (IST)
सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला मोठा धक्का दिला आहे. तेलंगणा सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तेलंगणा सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा येथील कॉँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकी केली होती. त्यावरील स्थगिती काढण्यास सुओपरीम कोर्टाने नकार दिला आहे. याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
16 ऑक्टोबर 2025 03:50 PM (IST)
देवूठाणी एकादशी कार्तिक महिन्याच्या अकराव्या दिवशी साजरी केली जाते. या एकादशीला देवुत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. देवुथनी एकादशीला रवि योग तयार होत आहे आणि दिवसभर पंचक देखील असणार आहे. तर रात्री भद्रा असेल. देवुथनी एकादशी ही चातुर्मासाची समाप्ती दर्शवते, कारण या दिवशी देवता जागृत होतात. ज्योतिषशास्त्रानुसार देवुथनी एकादशीला भगवान विष्णू योगिक निद्रेमधून बाहेर येतात. या दिवशी उपवास, पूजा आणि दान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि विष्णूच्या कृपेने मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.
16 ऑक्टोबर 2025 03:45 PM (IST)
दोन प्रेक्षकप्रिय मालिका “पारू” आणि “सावळ्याची जणू सावली” पुन्हा एकदा एका विशेष महासंगमासाठी एकत्र येत आहेत. नाट्यपूर्ण घडामोडी, आणि मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या महासंगमात काही जुने रहस्य खुले होणार आहेत, तर काही नात्यांना नवे वळण मिळणार आहे. शिवानीने आखलेला धोकादायक प्लॅन सारंगच्या कुटुंबाला अडचणीत टाकण्यास सुरुवात करतो. छोट्या छोट्या घटनांमधून गोंधळ वाढत जातो आणि नाती धोक्याच्या टोकावर पोहोचतात.
16 ऑक्टोबर 2025 03:20 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह सर्वच महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी दाखवल अब की बार 70 पार असा नारा दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.
16 ऑक्टोबर 2025 03:13 PM (IST)
खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बँकेच्या शेअर्समध्ये ही वाढ सप्टेंबर तिमाहीच्या निकालांनंतर झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा २६ टक्क्यांनी घसरून ५,०९० कोटी रुपयांवर आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ६,९१८ कोटी रुपये होता. नफ्यात घट होत असताना, ब्रोकरेज हाऊसेसनी बँकेच्या शेअर्सबद्दल वेगवेगळी मते दिली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की या तिमाहीत १,२३१ कोटी रुपयांच्या एका वेळेच्या तरतुदीमुळे अॅक्सिस बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला. परंतु इतर सर्व पॅरामीटर्स अपेक्षेपेक्षा चांगले होते.
16 ऑक्टोबर 2025 02:50 PM (IST)
सलमान खानच्या रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” मध्ये खूप नाट्यमयता पाहायला मिळत आहे. हाऊस कॅप्टन नेहल चुडासमाचा कॅप्टन म्हणूनचा काळ आता संपला आहे आणि घरातील सदस्यांना पुन्हा एकदा कॅप्टनशिपचे काम सोसावे लागणार आहे. निर्मात्यांनी अलीकडेच एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. त्यात स्पर्धकांच्या कुटुंबियांनी त्यांना पत्रे पाठवली आहेत. घरातून आलेली पत्रे वाचल्यानंतर, स्पर्धक कॅमेऱ्यासमोर रडू लागले. प्रोमोमध्ये मृदुल तिवारी, प्रणित मोरे आणि कुनिका सदानंद मोठ्याने रडताना दिसत आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी, या स्पर्धकांनी कॅप्टनशिपचा त्यागही केला आहे. चला जाणून घेऊया आगामी एपिसोडमध्ये काय आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:45 PM (IST)
कलर्स टीव्हीवरील रि ॲलिटी शो “बिग बॉस १९” मध्ये, स्पर्धक अनेकदा भांडणात अडकतात. या शोला मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे शोमधील स्पर्धकांमधील भांडण निर्माते शोला हिट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना खराब टीआरपी रेटिंगशिवाय दुसरे काहीही साध्य करण्यात अपयश मिळत आहे. परिणामी, शो लवकरच वेळेपूर्वीच बंद केला जाण्याची शक्यता आहे. परंतु अलीकडेच, राखी सावंतने खुलासा केला की ती “बिग बॉस १९” च्या घरात प्रवेश करत आहे. तसेच तिने चाहत्यांना वोट करा असे देखील सांगितले आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:40 PM (IST)
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे म्हटले जात होते. यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले होते. मात्र इतके दवास विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:35 PM (IST)
ज्योतिषशास्त्रानुसार 17 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. तूळ राशीच्या सौम्य उर्जेच्या प्रभावाखाली, आत्मविश्वासपूर्ण विचारसरणी जोडली जाते आणि लक्ष नातेसंबंध, सहकार्य आणि सामायिक ध्येयांकडे वळते. नेतृत्व, संवाद आणि भागीदारी यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घ्या
16 ऑक्टोबर 2025 02:30 PM (IST)
MP Crime Case: मध्य प्रदेश : इंदौरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरामध्ये स्वतःला बंद करत 24 तृतीयपंथींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. इंदूरमध्ये २४ ट्रान्सजेंडर लोकांनी फिनाइल प्यायल्याची घटना घडली आहे. या मागील गंभीर आणि धक्कादायक कारण समोर आले आहे. ही घटना पायल गुरु आणि सपना हाजी गटांमधील दीर्घकाळ चाललेल्या वादाचा परिणाम असल्याचे देखील समोर आले आङबे. यामधून ट्रान्सजेंडर व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग देखील केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:22 PM (IST)
दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या मुलांनी आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र मुलाने खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारतनगरमध्ये घडली. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे आहे. तर आरोपी मुलाचे नाव विजय अरुण निकम (वय ३५) असे आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:15 PM (IST)
टेलिव्हिजनच्या जगात जर असा एखादा कार्यक्रम असेल ज्याने वर्षानुवर्षे प्रेक्षकांना भुरळ घातली असेल तर तो म्हणजे “बिग बॉस” चा खेळ. दरवर्षी, हा रिॲलिटी शो नवीन चेहरे, नवीन भांडण, मैत्री, प्रेम आणि कधीकधी हृदयस्पर्शी क्षण देखील प्रेक्षकांना दाखवतात. “बिग बॉस १९” चा चालू सीझन प्रेक्षकांसाठी एक रोलरकोस्टर राईड ठरत आहे. नऊ आठवड्यांच्या या काळात भांडणांनी आणि गटबाजीने वातावरणाला चालना दिली आहे, परंतु या आठवड्यात एक असा टास्क पाहायला मिळाला ज्याने वातावरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. दिवाळीच्या खास प्रसंगी, जेव्हा स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पत्रे मिळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
16 ऑक्टोबर 2025 02:06 PM (IST)
BJP Candidate List in Bihar: बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात ही विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या 101 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टप्यात 18 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राघोपुरमधून सतीश कुमार यादव यांना तिकीट देण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर 2025 02:00 PM (IST)
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी समोर येत आहे. देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ वा हप्ताची (PM Kisan 21st Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारने आतापर्यंत २० हप्ते जारी केले आहेत आणि आता ते २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ही योजना शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांची मदत देते, जी तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार आहे.
16 ऑक्टोबर 2025 01:47 PM (IST)
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने एक महिन्याच्या तान्ह्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आहेत, ज्याला बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन होते. ही एक दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे, जिचा नवजात बाळांच्या श्वासोच्छवासावर आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. या तान्ह्या बाळावरील यशस्वी शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी नवजात बाळाची काळजी घेण्यामधील उल्लेखनीय कामगिरी आहे.
16 ऑक्टोबर 2025 01:40 PM (IST)
सोने आणि चांदीच्या वायदा व्यवहारात प्रचंड तेजी आहे. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या वायदा भावाने सर्वकालीन उच्चांक गाठला. चांदीनेही एक नवीन उच्चांक गाठला. ही बातमी लिहिताना, देशांतर्गत बाजारात सोन्याचा वायदा भाव १,२७,८०० रुपये आहे, तर चांदीचा भाव १,६३,६५० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या वायदा भावाने सर्वकालीन उच्चांक गाठला.
16 ऑक्टोबर 2025 01:30 PM (IST)
दीपावलीच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, बाजारपेठांमध्ये आकाश कंदीलांची खरेदी उत्साहात सुरू आहे. दिवाळी साजरी करण्याचा अविभाज्य भाग असलेल्या आकाश कंदीलांच्या खरेदीकडे यंदा विशेष लक्ष वेधले जात आहे. काही वर्षांच्या आधुनिक ट्रेंडनंतर नागरिक पुन्हा पारंपरिक षटकोनी आकाश कंदीलांकडे वळले आहेत. या आकाश कंदीलांची किंमत ३०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत असून पर्यावरणपूरक, साधेपण जपणारे आणि विशिष्ट कलाकुसर असलेले हे कंदील यावर्षी विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
16 ऑक्टोबर 2025 01:23 PM (IST)
अलिकडेच अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली, जी अफगाणिस्तानने ३-० ने जिंकली. या मालिकेत अफगाणिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी होती. अफगाणिस्तानने तिसरा सामना २०० धावांनी जिंकला, जो एकदिवसीय इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय होता. या सामन्यादरम्यान, अफगाणिस्तानचा खेळाडू इब्राहिम झद्रानचे मैदानावरील वर्तन महागात पडले, ज्यामुळे आयसीसीने त्याला शिक्षा ठोठावली.
16 ऑक्टोबर 2025 01:00 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यात संघर्ष सुरु होता. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप करत होते. या संघर्षामुळे दोन्ही देशांच्या शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. पण अखेर बुधवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळपासून ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू केली आहे.
16 ऑक्टोबर 2025 12:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरुन निशाणा साधला आहे. त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला आहे, पण त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे मोठे पाऊल असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
16 ऑक्टोबर 2025 12:27 PM (IST)
राजस्थानमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली पूर्ण रिक्षा रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात पडली. यावेळी विद्यार्थी देखील रस्त्यावर आणि खड्ड्यात पडले. याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
Place: Rajgarh
District: Churu
State: Rajasthan
Chief Minister: BJP
Prime Minister: BJP
MLA: BJP#ModiHaiTohMumkinHai pic.twitter.com/fFydSO0j3R— Mohit Chauhan (@mohitlaws) October 14, 2025
16 ऑक्टोबर 2025 12:19 PM (IST)
सिम्बायोसिस कॉलेजमधील पदवी प्रदान सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच प्रमुख मंचावर बसणार होते. मात्र मंचावर साप रांगताना दिसून आला. या सापाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मंचाच्या आसपासच्या परिसरामध्ये साप दिसून आला. प आढळल्यामुळे उपस्थित यंत्रणांची धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा साप मंचाच्या खाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सापाला बाजूला करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. तसेच या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमापूर्वी साप पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
16 ऑक्टोबर 2025 12:00 PM (IST)
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या ग्रुपने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिना शोधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये त्यांनी केसाळ गोगलगायींच्या एका नवीन प्रजातीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे या लहान प्रजातींच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.
16 ऑक्टोबर 2025 11:50 AM (IST)
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, याच व्हायरल व्हिडीओंमध्ये काही कैद्यांनी मोबाईलवर रील्स देखील बनवल्याचे उघड झाले आहे
16 ऑक्टोबर 2025 11:40 AM (IST)
केंद्र सरकारनुसार, राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास 31.01 लाख असे लाभार्थी आहेत, जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत. तर नियमानुसार, एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ घेता येतो. त्यांच्या खात्यात वार्षिक 6 हजार रुपये जमा होतात. याविषयीच्या काही वृत्तानुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात अर्जांची, ईकेवायसीची पडताळणी सुरू केली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पीएम किसान निधी योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावं या यादीतून बाद होणार आहे.
16 ऑक्टोबर 2025 11:33 AM (IST)
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली.
16 ऑक्टोबर 2025 11:25 AM (IST)
बागेश्वर धामचे आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री हे मधुरामधून म्हणाले की,"... ब्रिज धाममधील मांस आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करावेत आणि त्यांना ब्रिज परिसरातून बाहेर ठेवावे. या शुभ इच्छेने, आम्ही ही पदयात्रा काढू. आज मथुरा येथे त्यासाठी एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथे आम्ही शपथ घेतली की, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून, आम्ही भगवान कृष्णाला सांगितले की, कृष्ण लल्ला, आम्ही लवकरच येऊन येथे मंदिर बांधू."
16 ऑक्टोबर 2025 11:15 AM (IST)
उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरीची दीपावली ही नेहमीच खास मानली जाते. अयोध्यामध्ये होणार नेत्रदीपक दीपोत्सव पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात. १९ ऑक्टोबर रोजी अयोध्येत होणाऱ्या दीपोत्सवापूर्वी राम की पैडी येथे लेसर आणि लाईट शोची चाचणी घेण्यात आली आहे.
16 ऑक्टोबर 2025 11:05 AM (IST)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक कटू अध्याय म्हणजे बंगालची फाळणी. बंगालच्या फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग झाले. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा झाला. फाळणीमागे इंग्रजांची “फोडा आणि राज्य करा” हा हेतू होता. लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. याविरोधात नंतर जोरदार आंदोलन झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.