नवी दिल्ली : जागतिक आरोग्य सभेच्या 75 व्या सत्रात डब्ल्यु एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात- जिनिव्हा येथे- केलेल्या ऐतिहासिक भाषणात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी, जागतिक स्तरावर अधिक मजबूत आरोग्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठीची भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. डब्ल्यु एच ओ अधिक बळकट करण्याची गरज ठामपणे व्यक्त करताना ते म्हणाले.
“भारताच्या पंतप्रधानांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, लसी आणि औषधांच्या समानशील वितरणासाठी, जागतिक पातळीवर टिकाऊ आणि मजबूत अशी पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज आहे. यामध्ये लसी आणि उपचारपद्धतींना डब्ल्यु एच ओ ची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरळीत करणे आणि डब्ल्यु एच ओ ला सशक्त करून अधिक टिकाऊ अशी जागतिक आरोग्य सुरक्षा व्यवस्था उभी करणे हेही अनुस्यूत आहे.” जागतिक संरचनेचा एक जबाबदार सदस्य देश म्हणून या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी भारत तयार आहे, असेही ते म्हणाले.
भारताच्या मते या वर्षीची “शांतता आणि आरोग्य” यांना जोडणारी डब्ल्यु एच ओ ची संकल्पना अगदी कालोचित आणि समर्पक आहे, कारण शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही, असेही मांडवीय यांनी नमूद केले.
मात्र भारताच्या वैधानिक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेली देशविशिष्ट अधिकृत आकडेवारी विचारात न घेता, जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या त्यांच्या निरीक्षणांमध्ये भारतातील मृत्युसंख्या अधिक दाखविल्याबद्दल, या सत्रात भारताने नाराजी आणि चिंता व्यक्त केली. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भारतातील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण परिषदेने नोंदवलेली सामूहिक नाराजी या मंचावर त्यांच्यावतीने व्यक्त केली.
[read_also content=”तुम्ही पोस्टर फाडाल, आक्रोश थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका https://www.navarashtra.com/maharashtra/you-tear-up-posters-you-cant-stop-crying-criticism-of-devendra-fadnavis-nrdm-283921.html”]
भारतातील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या संस्थेने, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अधिक मृत्युसंख्येमागील दृष्टिकोन आणि मोजणीपद्धत यांना विरोध दर्शवणारा ठराव एकमताने मंजूर केला होता.