‘2024 मध्येही भगवी लाट, लोकसभेपूर्वी झालेल्या विजयाने भाजपला दिली मोठी ताकद; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं विधान

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार विजयाने काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेते आणि सर्वेक्षणे सांगत होते की, 2024 मध्ये भगवी लाट येण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार विजयाने काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेते आणि सर्वेक्षणे सांगत होते की, 2024 मध्ये भगवी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु आता काँग्रेसजनही यावर विश्वास ठेवू लागले आहेत, असं मोठं विधान माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केलं आहे.

    चिदंबरम म्हणाले, ‘तीन राज्यांचे निकाल आमच्यासाठी चिंताजनक आणि आश्चर्यकारक आहेत. एवढेच नाही तर त्यांनी भाजपची ताकद आणि त्यांच्या धोरणात्मक कौशल्याचेही कौतुक केले. भाजप प्रत्येक निवडणूक जणू शेवटची लढाई असल्याप्रमाणे लढते. विरोधकांनी हे समजून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपच्या तीन राज्यांतील विजयाने भाजपला मोठी ताकद दिली आहे. 2024 मध्ये भाजपच्या बाजूने वारे वाहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    छत्तीसगड आणि राजस्थानमधील पराभव काँग्रेससाठी अनपेक्षित होता. हे निकाल आमच्यासाठी चिंताजनक आहेत. मला वाटते की पक्ष नेतृत्व हे समजून घेईल आणि कमजोरी दूर करेल. चार मोठ्या राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला 40 टक्के मते मिळाली आहेत. यावरून काँग्रेसची मते त्यांच्याकडे गेल्याचे दिसून येते. तसेच भाजपला नवीन मतदार आपल्याकडे ओढण्यात यश आले आहे.