लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदानाला सुरुवात, नितीन गडकरी सहीत अनेक दिग्गज नेते आहेत रिंगणात!

राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

    देशात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्प्यातील मतदान पार पडत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान (Voting) सुरू झालं आहे. राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात मतदान केले. संघ मुख्यालयाजवळील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.

    विदर्भााल चार मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर, भंडारा या पूर्वविदर्भातीलच मतदारसंघांचा समावेश आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने तिथे मतदानासाठी सुरक्षेची विषय काळजी घेतली जात आहे. या पाचपैकी फक्त रामटेक मतदारसंघात काँग्रेस व शिंदेसेनेची लढत होणार आहे. उर्वरित चारही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी विदर्भातील पारंपारिक लढत चुरशीची होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

    नागपुरात मोहन भागवत यांनी केलं मतदान

    मतदान हे आपले कर्तव्य आहे, आपला हक्क आहे. १०० टक्के मतदान झालं पाहिजे. मी माझं मत दिलं आहे, तुम्हीही द्या, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.