मुंबई : पराभवातून पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत यंदा गांधी घराण्यातील एका ही सदस्याने भाग घेतलेला नाही. तेव्हा १३८ वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षात अशी निवडणूक सहाव्यांदा होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या अशा ऐतिहासिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज देशभरात पारपडणार आहे.
मतदानासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ स्थापन करण्यात आले असून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुमारे ९८०० मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. यंदा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर या दोन उमेदवारांमध्ये चुरस रंगली आहे.
सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांच्यासह सीडब्ल्यूसीचे सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करणार आहेत. तर राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत.
या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे ४० मतदार मतदान करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे बेंगळुरू येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आणि शशी थरूर तिरुअनंतपुरममध्ये मतदान करणार आहेत. मतदानानंतर मतपेट्या दिल्लीत आणल्या जाणार असून पक्षाच्या मुख्यालयात १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच त्याच दिवशी निकाल देखील घोषित करण्यात येईल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल २२ वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल २४ वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याने काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक सर्व दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.