भुवनेश्वर : ओडिशाचे (Odisha) आरोग्यमंत्री (Health Minister) नब किशोर दास (Naba Das) यांची त्यांच्याच सुरक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं सारा देश हळहळला. पोलिसांनी सांगितलं की, मंत्र्यांच्या सुरक्षेच्या ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस सह उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास याने गोळ्या मारुन हत्या केली. ब्रजराजनगरमध्ये हा प्रकार घडला. गोळ्या झाडल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना तातडीनं भुवनेश्वरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र प्रचंद प्रयत्नांनतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. मंत्र्याला गोळी मारणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला मात्र स्थानिकांनी पकडलंय. पोलीस आता या प्रकरणात चौकशी करीत आहे. अद्याप हल्ल्याचं खरं कारण समोर आलेलं नाही. आरोपी पोलीस अधिकारी गोपालकृष्ण दास याच्या पत्नीनंही टीव्हीवरील बातम्यांत हे सगळं कळाल्याचं सांगितलंय. आता हा आरोपी पोलीस अधिकारी गोपालकृष्ण दास याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येते आहे.
कोण आहे हा हत्यारा पोलीस अधिकारी ?
आरोग्यमंत्री दास यांची हत्या करणारा आरोपी गोपालदास हा गंजाम जिल्ह्यातील जलेश्वरखंडी गावातील रहिवासी आहे. बरहमपूरमध्ये पोलीस हवालदार म्हणून त्यानं करियरला सुरुवात केली. 12 वर्षांपूर्वी त्याचं प्रमोशन करण्यात आलं आणि झारसुगुडा येथे त्याची बदली करण्यात आली. त्याचं सध्याचं पोस्टिंग हे बजरंगनगरमध्ये गांधी चौक आउटपोस्टच्या प्रभारीच्या रुपात होती. गोपाल दास याच्या भूतकाळाचा शोध घेतल्यास तो मानसिक रुग्ण असल्याचं आणि त्याला बीपीचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे.
गोपालदास हा बायपोलर डीसऑर्डर या आजारानं ग्रस्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गोपालदासला फार लवकर राग येत असे. या शीघ्र संतापाबाबत त्याच्यावर उपचार सुरु असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यासाठी तो गेल्या 8-10 वर्षांपासून उपचार घेत असल्याची माहिती आहे. गोपालदास याची पत्नी अंजली हिनेही याची कबुली दिली आहे. पती औषधं घेत असल्याचं तिनंही मान्य केलंय. मात्र ते घरापासून 400 किमी अंतरावर राहत असल्याने ते नियमित ओषधं घेत होते का, याची माहिती नसल्याचंही तिनं सांगितलंय.
बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय ?
या आजारात रुग्णाची मानसिक अवस्था झपाट्यानं बदलते. कधी तो डिप्रेशनमध्ये जातो, तर त्याला कधी अचानक प्रचंड संताप येतो. समुपदेशन करुन आणि उपचार करुन हा आजार नियंत्रणात आणता येतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मानसिक स्थिती नीट नव्हती तर पिसतुल कसे दिले ?
एका मंत्र्याची पोलीस अधिकाऱ्याच्या हातून हत्या झाल्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतायेत. गोपालदास याची मानसिक स्थिती नीट नव्हती, हे माहीत असूनही त्याला बंदूक कशी देण्यात आली, याची विचारणा आता करण्यात येतेय. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गोपालदास याची ड्युटी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी लावण्यात आली होती. मंत्र्यावर गोळीबार करण्याच्या आधी त्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर गोपालदासनं बाईक पार्क केली होती. मंत्री कारमधून उतरत असताना त्यानं हा गोळीबार केला. त्यातली एक गोळी मंत्र्याला लागली. घटनेनंतर हवेत गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न गोपालदासनं केला. मात्र त्याला स्थानिकांनी पकडलं. मात्र ही हत्या का करण्यात आली, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
अनेक मेडल्स आणि रोख पुरस्कार जिंकले होते.
५४ वर्षीय गोपालदास यानं त्याच्या पोलीस कारकिर्दीत अनेक मेडल्स मिळवले होते. तपासात चांगली भूमिका असल्याचं आत्तापर्यं १८ मेडल्स त्याला मिळाले होते. तसचं करियरमध्ये ८ वेळा रोख पुरस्कारही गोपालदासच्या नावे आहेत. एकदाच त्याला इशारा देऊन सोडण्यात आलं होतं. त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये त्याच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबत काहीही माहिती नसल्याचंही सांगण्यात येतंय. आता या हत्येचा तपास सीआयडीकडं सोपवण्यात आला असून, सात जणांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करीत आहे. दरम्यान त्यांच्या हत्येचं मोठं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केलाय.
सर्वात श्रीमंत आमदार होते नब किशोर दास
नब किशोर दास हे झारसुगुडाचे ताकदवान नेते होते. तसंच ओडिशातील सर्वाधिक संपत्ती असलेले आमदाराही होते. मायनिंग आणि ट्रान्स्पोर्ट या व्यवसायात ते होते. 34 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यात 25 कोटींची 80 वाहनं त्यांच्याकडं होती. 2019 साली निवडणुकांपूर्वी काँग्रेस सोडून त्यांनी बीजेडीत प्रवेश केला होता.