Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं
नवी दिल्ली : कोरोना काळात कोट्यवधी लोकांचे जीव वाचवण्याचे काम आपल्या देशातील तरुणपीढीने केले आहे. सध्या ईव्हीचे युग आहे. त्यानुसार, विकास केला जात आहे. मुद्रा योजनेतही देशातील कोट्यवधी युवक-युवती कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहत आहेत आणि आपल्या साथीदारांनाही मदत करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. तसेच अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या देशांनाही सज्जड दम भरला. ‘अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही’, असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं.
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आता केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, तरुणांना प्रेरणा देणं गरजेचे आहे. तुमच्या आयडिया, कल्पना जगवा. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. जर तुमच्या सूचना असतील तर त्या द्या. आपण बदल करू. आता पुढे जाण्याची संधी आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त पुढे या, असे तरुणांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे.
तसेच पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला. पहलगाममध्ये धर्म विचारुन मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली. पाकिस्तान उद्धवस्त झाल्यासंबंधी रोज नवनवी माहिती येत आहे. पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झाल्याचीही माहिती आहे.
अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करतोय
हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे. तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो. आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.