कोलाड प्रतिनिधी: रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच एक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळ कारला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोलाड पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावर सेलोरीयो कार (एमएच-47-डब्लू-1765) कोलाड कोकण रेल्वे पुलाखालून हायस्कूलकडे जात असताना गोवा बाजुकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर चालकाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये योगेश सुधाकर गुरव रा. वरसे-रोहा, परेश नामदेव खांडेकर रा. अष्टमी-रोहा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, योगेश मनोहर पाटील रा. वरसे-रोहा हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी, ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव रा. संभल-उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, सपोनि एन.एम. मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन.एल. चौधरी, पोहवा एन.व्हाय. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.