“आमच्या सरकारमध्ये सर्व काही ठिक आहे. आमचं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल.” असं महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून सांगण्यात येत असतं पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती असल्याचं नेहमीच समोर आलं आहे. आता सुध्दा असंच काहीसं घडलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महिला बालकल्याण मंत्री यसोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर हे दिल्तीत दाखल झाले असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसफूस संदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा लखनऊ येथे पोहोचले होते. लखनऊ येथे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
यासोबतच विधासभेचे रिक्त असलेले अध्यक्षपद या संदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आल्यावर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अध्यक्षपदवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसेच राज्यमंत्रिमंडळात येत्या काळात खांदेपालट होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे आता या भेटीमागे नेमकं कारण काय हे पाहाण महत्वाचं ठरणार आहे.