मागील वर्षभरापासून मणिपूरमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुकी आणि मैतेई समाजात चालू असलेल्या संघर्षामुळे तिथे भीतीदायक वातावरण चालू आहे. हा वाद अजूनही राज्यात चालू आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले होते.मणिपूरमध्ये सुरु असलेल्या वादाचा परिमाण लोकसभा निवडणुकीवर दिसून आला आहे.
देशभरात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी केली जात असताना दुसरीकडे मणिपूरमध्ये वेगळेच चित्र आहे. मणिपूरमध्ये इन कॅमेरा बैठका होत आहेत. तर सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यात आली आहे. मणिपूरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.
मणिपूरमधील उमेदवार
लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दोन जागा आहेत. यातील पहिली जागा ही अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ तर दुसरी जागा ही बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ अशी आहे. यामध्ये अंतर्गत मणिपूरमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरले आहेत. या सहा प्रमुख चेहऱ्यांमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी थोउनाओजम बसंता सिंह हे भाजपकडून उमेदवार आहेत तर जेएनयूचे प्राध्यापक बिमोल अकोईजोम हे काही दिवसांआधी राजकारणात सहभागी झाले असून ते काँग्रेसकडून लोकसभेच्या रींगणात उतरले आहेत. माहेश्वर थोनाऊजोम हे आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचे आहेत, तर आर के सोमेंद्र हे मणिपूर पिपल्स पार्टीचे उमेदवार आहेत. तसेच माहेश्वर आणि सोमेंद्र हे मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र सध्या मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा कोणताही प्रचार किंवा जाहीर सभा होताना दिसत नाही. तसेच कोणत्याच राजकीय पक्षाने प्रचाराची पोस्टर्स देखील लावलेली नाहीत. मणिपूरमध्ये गर्दी निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये उभे राहिलेले मतदार हे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी इन कॅमेरा बैठकांचा आयोजन केले जात आहे. तसेच २० ते २५ जणांच्या गटाला घरातून किंवा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडूनखाजगी कार्यालयापर्यंत पोहचवून तिथे उमेदवारांची सभा घेतली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मणिपूरात मोदी शाहांचा प्रचार होताना फारसा दिसत नाही. भाजपकडून निवडणुकीसाठी अनेक सभा घेण्यात आल्या मात्र मणिपूरमध्ये एकही सभा घेण्यात आली नाही. आम्ही इन कॅमेरा बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देणार आहोत, असे भाजपच्या काही नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.